कुरीयर चालकाकडील 65 लाखांच्या सोन्याची धुळ्यानजीक लूट : दोघे जाळ्यात
धुळे गुन्हे शाखेसह शहर पोलिसांची मोठी कामगिरी : पथकाला दहा हजारांचे बक्षीस
Heist of 65 lakhs worth of gold from a courier driver : Two in the net धुळे : धुळ्यासह नंदुरबारातील सराफांचे एस.टी.तून 65 लाखांचे सोने आणणार्या कुरीयर चालकाला चहातून गुंगीकारक पदार्थ पाजून एस.टी.प्रवासात लूटण्यात आले होते. धुळे शहर गुन्हे शाखा व धुळे शहर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पथकाला दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
असे आहे नेमके लुटीचे प्रकरण
मुंबई येथील काळबादेवी परीसरातील विष्णुसिंह शिखरवार यांची जय बजरंग कुरीअर सेवा आहे. या कुरीअरच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातील सराफी काम करणार्या दुकानांचे दागिने पोहोच करण्याचे काम केले जाते. याच अंतर्गत कुरीअरचा डिलिव्हरी बॉय गोविंद रघुनाथसिंह शिखरवार हा शहरातील व्यापार्यांचे सोन्याचे दागिने घेवून बुधवार, 14 जून रोजी पहाटे साडेपाच वाजता नाशिक येथून धुळे बसमध्ये प्रवासी करीत असताना बसमध्ये त्याला गुंगी आली. धुळ्याला आल्यावर बॅगमध्ये ओले नारळ आणि पाण्याची बाटली ठेऊन कोणीतरी दागिने लंपास केल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी विष्णूसिंह सिकरवार यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
तांत्रिक माहितीतून आरोपी निष्पन्न
तांत्रिक माहितीच्या आधारे व नाशिक, धुळे येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीत काही नावे समोर आली. त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये गेले होते. त्यात आग्रा जिल्ह्यातील जाजू गावातून पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपूत (32, रा.धोलपूर, राजस्थान) आणि राहुल राजेंद्रसिंग सिसोदिया (25, रा.आग्रा, उत्तरप्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सोने चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परीरषदेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, यांनी या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्यासह तपास पथक उपस्थित होते.
असा मुद्देमाल केला जप्त
चोरुन नेलेल्या मालापैकी 770 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन किलो 400 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 49 लाख 36 हजार 715 रुपयांचा ऐवज व गुन्ह्यात वापरलेली आठ लाख रुपये किंमतीची बलेनो कंपनीची कार (यु.पी.83 ए.यु. 9330) असा एकूण 57 लाख 36 हजार 715 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. संशयीत राहुल सिसोदिया यास धुळ्यातून ताब्यात घेतले. त्याने कुरीयर बॉय गोविंद सिकरवार यास चहामध्ये गुंगीकारक औषध पाजले होते. यामुळे तो बसमध्ये गाढ झोपला. त्यानंतर दागिन्यांचे पार्सल लांबविण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यातील अन्य दोघा संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी केली गुन्ह्याची उकल !
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, तपास अधिकारी सपोनि चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, विजय शिरसाट, योगेश चव्हाण, कुंदन पटाईत, पंकज खैरमोडे, मनीष सोनगीरे, महेश मोरे यांनी केली. तपास पथकास सायबर विभागाचे सहाय्यक निरीक्षक संजय पाटील, अमोल जाधव यांनी तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली.