कंडारीत जुना वाद बेतला भावंडांच्या जीवावर : एकाच वेळी निघाली दोघांची अंत्ययात्रा

आरोपींना ताब्यात देण्याच्या मागणीसाठी निरीक्षकांना घेराव : त्रिकूटाला अटक


An old dispute in Kandari has cost the lives of siblings : the funeral procession of both started at the same time भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील वीटभट्टी व्यावसायीक दोघा भावंडांची जुन्या वादातून लोखंडी रॉड व चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडल्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता एकाचवेळी वेळी दोघा भावंडांची सोबत अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, खुनातील आरोपींना ताब्यात द्यावे, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त जमावाने शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांना ट्रामा केअर सेंटरमध्ये घेराव घातला. यावेळी महिलांचा जमाव अत्यंत आक्रमक झाला होता. पोलीस निरीक्षक पडघण यांनी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देत अन्य संशयितांनाही लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

जुना वाद भावंडांच्या जीवावर
सूत्रांच्या माहितीनुसार, कंडारी गावातील वीटभट्टी व्यावसायीक शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) यांचा गावातील काहींशी जुनाच वाद आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता संशयित आरोपी वखारीजवळील पानटपरीवर आल्यानंतर शांताराम साळुंखे हादेखील पानटपरीवर पोहोचला असता दीपक छगन तायडे याने शिविगाळ केल्याने शांतारामने ही बाब चुलत भाऊ विकास साळुंखे यास सांगितल्यानंतर शांताराम, विकास, राकेश व मित्र रमेश इंगळे असे चौघे चौकात दुचाकीने आले असता संशयित दीपकला शिविगाळ केल्याची विचारणा केल्यानंतर दीपकने हातातील चॉपर विकासच्या कानाखाली मारला तर अन्य पाच संशयितांनी चुलत भावांना लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. संशयितांनी शांताराम व राकेश साळुंखे या भावंडांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रमेश इंगळे हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्यास गोदावरी रुग्णाालयात हलवण्यात आले आहेत तर फिर्यादी विकास चंद्रकांत साळुंखे (30) याच्यावर ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

दहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा : त्रिकूटाला अटक
शांताराम व राकेश साळुंखे या भावंडांच्या खून प्रकरणी विकास चंद्रकांत साळुंखे (28, महादेव टेकडी, कंडारी) यांच्या फिर्यादीवरून दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवी भील, किरण सपकाळे यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी दीपक तायडे, मनोज मोरे व किरण सपकाळे या तीन संशयितांना अटक केली असून अन्य संशयितांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

आरोपींना अटक करण्यासाठी जमाव आक्रमक
दोघा भावंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर कंडारी गावातील मृतांचे आप्त अत्यंत संतप्त झाले होते. ट्रामा केअर सेंटरमध्ये जमलेल्या समाजबांधव महिलांनी शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांना घेराव घालत सर्व आरोपींना ताब्यात देण्याची तसेच जागेवरच त्यांना फाशी देण्याची मागणी केल्याने ट्रामा सेंटरमध्ये वातावरण तप्त झाले होते. यावेळी पडघण यांनी जमावाची समजूत काढत सर्व आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर महिलांचा राग शांत झाला.

पोलीस अधीक्षकांनी जाणली माहिती
शुक्रवारी रात्री कंडारीतील खून प्रकरणानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी धाव घेतली तर जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शनिवारी सकाळी कंडारीसह श्रीराम नगरातील खून झालेल्या घटनास्थळाची पाहणी करीत यंत्रणेला तपासाबाबत सूचना केल्या. जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळासह ट्रामा सेंटरला भेट देत परीस्थिती नियंत्रणात ठेवली.

तीन वर्षानंतर खरात हत्याकांडाच्या आठवणी जाग्या
रविवार, 6 सप्टेंबर 2019 रोजी भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू (29), मुलगा प्रेमसागर (26) तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व खरात भावंडांचा मित्र सुमित संजय गजरे (18) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा भुसावळसह कंडारी एकाचवेळी तिघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.


कॉपी करू नका.