जळगाव जिल्हा नियोजन निधी वितरण व खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम
सर्व कार्यान्वयन यंत्रणेने वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करावेत - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : प्राप्त निधीशी वितरीत निधी 50.70 टक्के, खर्च 43.05 टक्के
Jalgaon District Planning Fund Distribution and Expenditure Jalgaon District is first in the state जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त 363.18 कोटी रूपये निधीमधून 184.14 कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी 50.70 टक्के व खर्चाची टक्केवारी 43.05 टक्के आहे. निधी वितरण व खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी वितरण व खर्चात जिल्हा राज्यात प्रथम आहे.
जिल्हा नियोजनच्या कामकाजात आली गती
जिल्हाधिकारी पदाचा आयुष प्रसाद यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर 2023 असा 100 दिवसांचा कालबध्द कार्यक्रम आखला. या कालबध्द कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश व निधी प्राप्त करून खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी वेळोवेळी दिल्या होत्या. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात गतिमानता आली.


प्राप्त निधीशी वितरीत निधी व खर्चाच्या टक्केवारीत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अनुक्रमे गोंदिया, भंडारा, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक विभागातील धुळे जिल्हा 9 वा क्रमांक, नाशिक 11 वा क्रमांक, नंदुरबार 12 वा क्रमांक व अहमदनगर 19 व्या क्रमांकावर आहे.
शंभर दिवसाच्या कालबध्द कार्यक्रमानुसार 10 डिसेंबर 2023 पर्यंत शंभर टक्के कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष कामांना तांत्रिक मान्यतेपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्यात येत आहे.
निधी वितरित कामांचे कार्यारंभ आदेश काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पालकमंत्री यांच्या अजेंड्यावरील विषय व लोक प्रतिनिधी यांच्याकडील कामांना प्रशासकीय मान्यता देताना त्यांना विश्वासात घेण्यात यावे. कार्यान्वयन यंत्रणांनी वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.





