हाडाखेडनजीक सलग दुसर्‍या दिवशी 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त

शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी : हरीयाणातील आयशर चालकाला अटक ; मुख्य म्होरक्यांवर कारवाईची अपेक्षा


16 lakh Punjab-made liquor stock seized near Hadakhed for the second day in a row शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पंजाब राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत तब्बल 53 लाखांचा अवैध मद्यसाठा हाडाखेड चेक पोस्टवर सोमवारी जप्त केला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पंजाबनिर्मित 16 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने अवैधरीत्या मद्य तस्करी करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आयशर चालक सुनीलकुमार राजपाल जाट (28, धानीसरल, ता.तोसाम, जि.भवानी, हरीयाणा) यास अटक करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील कर चुकवून हे मद्य विकण्याच्या मनसुब्यावर शिरपूर तालुका पोलिसांनी पाणी फिरवले असून आता मद्य तस्करी करणार्‍या मुख्य म्होरक्यांनाही बेड्या ठोकण्याच्या अपेक्षा आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना अवैधरीत्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी त्यांनी पथकासह सापळा रचला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील हाडाखेड गावाजवळील हॉटेल जय बाबारी येथे पथक धडकल्यानंतर आयशर (एन.एल.07 ए.ए.3503) ची तपासणी केल्यानंतर त्यात पंजाबनिर्मित मद्यसाठा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहन ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन लाख 42 हजार 400 रुपये किंमतीची ऑलसीजन कंपनीची दारू, तीन लाख 63 हजार 600 रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज दारू, एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीची मॅकडॉल नंबर वन दारू, नऊ लाख रुपये किंमतीची मॅकडॉल नंबर वन दारू तसेच 21 हजार 600 रुपये किंमतीची कॉसबर्ग कंपनीची बियर तसेच 15 लाखांची आयशर मिळून 31 लाख 33 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, सुनील वसावे, संतो पाटील संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, चालक अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने केली. कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !