सोनगीरनजीक 65 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त
युपीतील चालकाला अटक : धुळे गुन्हे शाखेची कामगिरी
65 Lakhs of prohibited gutkha seized near Songir धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सोनगीरजवळून राज्यात प्रतिबंधीत असलेला तब्बल 65 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवार, 21 रोजी करण्यात आली. याप्रकरणी नरेशकुमार घनश्यामसिंग चौधरी (42, मुरसाना, सहकारी नगर, बुलंदशहर, उत्तरप्रदेश) या कंटेनर चालकास अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुटख्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह सापळा रचला. सोनगीर शहराजवळील हॉटेल सत्यमसमोर कंटेनर (एच.आर.38 ए.सी.0422) ची झडती घेतल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याने कंटेनर जप्त करून पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आला. पंचांसमक्ष गुटख्याची मोजणी केल्यानंतर 56 लाख 25 हजार 900 रुपये किंमतीचा शिखर पानमसाला, आठ लाख 82 हजार रुपये किंमतीची तंबाखू व 20 लाखांचा कंटेनर असा एकूण 85 लाख सात हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनर चालक नरेशकुमार घनश्यामसिंग चौधरी (42, मुरसाना, सहकारी नगर, बुलंदशहर, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक निरीक्षक गणेश फड, श्याम निकम, संजय पाटील, संदीप सरग, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, संदीप पाटील, अशोक पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, सुरेश भालेराव, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जितेंद्र वाघ, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील, चालक संजय सुरसे आदींच्या पथकाने केली.
