चोरीच्या दहा दुचाकींसह धुळ्यातील संशयित जाळ्यात
धुळे तालुका पोलिसांची कामगिरी : धुळ्यासह मालेगाव भागातून लांबवल्या दुचाकी
Suspects nabbed in Dhule along with 10 stolen bikes धुळे : धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या तपासात कुविख्यात आरोपीला बेड्या ठोकत त्याच्याकडून तब्बल तीन लाख दहा हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयिताने या दुचाकी धुळे व मालेगाव भागातून चोरल्याची माहिती समोर आली आहे तर या प्रकरणी गुन्हेदेखील दाखल आहेत. गोपाल देविदास पाटील (38, मोहाडी उपनगर, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे तर संशयिताचा साथीदार मात्र पसार असून त्याचादेखील कसून शोध सुरू आहे.
दुचाकी चोरीनंतर संशयिताचा लागला तपास
तक्रारदार महेंद्र मोहन बोरसे (35, चितोड, ता.धुळे) यांची शिरूड चौफुली येथून दुचाकी (एम.एच.18 सी.ए.1205) ही 10 फेब्रुवारी 2024 रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित गोपाल पाटील याचे नाव समोर आल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयित पाटील याच्याविरोधात यापूर्वीही दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.





यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव काळे, हवालदार सुनील जवरे, ललित खळगे, रवींद्र सोनवणे, सुरेंद्र खांडेकर, राजू पावरा, राहुल देवरे, संदीप गुरव, दीपक मोहिते, योगेश वानखेडे, प्रमोद पाटील, अमोल कापसे आदींच्या पथकाने केली.
