जळगावसह पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी : अट्टल चोरटे रामानंद पोलिसांच्या जाळ्यात
Theft of two-wheelers in Jalgaon and Pune districts : Attal thieves in the net of Ramanand police जळगाव : जळगावच्या रामानंद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधार जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणार्या दोन संशयित आरोपींना छत्रपती संभाजी नगरातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
जळगाव शहरातील आदर्श नगरातून गुरुवार, 4 एप्रिल रोजी धनंजय सुभाष परदेशी यांची दुचाकी चोरी झाली मात्र चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयीत निष्पन्न केल्यानंतर ते छत्रपती संभाजी नगर येथील असल्याची माहिती काढली. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने पथक रवाना केले. पथकाने दिलीप रामदास राठोड (30) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरी केलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या तर गुन्ह्यात साथीदार अनिल चंडौल असल्याची कबुली दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून दोन जप्त करण्यात आल्या.
जळगावसह पुण्यातून दुचाकींची चोरी
जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी तीन दुचाकी रामानंद नगर तर तीन दुचाकी जळगाव जिल्हापेठ, एक दुचाकी जळगाव शहर पोलीस ठाणे तर एक दुचाकी ही पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. रामानंद नगर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत केल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यातील अंमलदार हवालदार जितेंद्र राजपूत, सुशील चौधरी यांच्यासह गुन्हे शोध पथकाला रिवॉर्ड दिला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशील चौधरी, इरफान मलिक, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, हेमंत कळसकर, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मनोज मराठे, दीपक वंजारी, निलेश बच्छाव यांच्या पथकाने केली.