भुसावळात गुरांची निर्दयतेने वाहतूक : 18 म्हशींची सुटका : मध्यप्रदेशातील चालकाविरोधात गुन्हा

Cruel transportation of cattle in Bhusawal : 18 buffaloes freed : Crime against driver in Madhya Pradesh भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून भरधाव वेगाने ट्रकमध्ये अत्यंत निदर्यतेने व कोंबून वाहतूक करताना गो प्रेमींनी शहरातील भोई नगर रस्त्यावर ट्रक अडवत 18 म्हशींची सुटका केली. याप्रकरणी मध्यप्रदेशातील चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरांची वाहतूक ऐरणीवर
मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असताना गो प्रेमींकडून मात्र गुरांची तस्करी होणार्या वाहनांवर सातत्याने कारवाई होत आहे. भुसावळातील गो प्रेमींना कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवार, 1 मे रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक (क्रमांक एम.एच.41 ए.यु.6455) अडवल्यानंतर त्याची पाहणी केली असता त्यात म्हशींची अत्यंत निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यावेळी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला. यावेळी ट्रकमधील पाच लाख 40 हजार रुपये किंमतीच्या एकूण 18 म्हशींची जळगावच्या बाफना गो शाळेत रवानगी करण्यात आली तर आठ लाख रुपयांचा आयशर ट्रक जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मानद प्राणी कल्याण अधिकारी रोहित रमेश महाले (37, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून आयशर चालक अफजल फाजल खान (27, बालसमूद, तहसील कसरावद, जि.खरगोन, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
