भुसावळ शहरवासीयांची मदार टँकरवर : 35 टँकर भागवताय तहान


भुसावळ : तापी नदी व हतनूरचे वरदान लाभलेल्या भुसावळकरांना आजघडीला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने मे हिटच्या रणरणत्या उन्हात त्यांना भटकंती करावी लागत आहे. शहरासाठी अमृत योजना मंजूर असलीतरी योजना पूर्ण होण्यास आणखी किमान वर्ष-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे मात्र तो पर्यंत तरी भुसावळकरांच्या नशिबी भटकंती निश्चित आहे. पालिकेकडून वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची मदार टँकरवर आहे. पालिकेच्या माध्यमातून 10 तर माजी नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 25 अशा 35 टँकरवर शहरवासीयांची भिस्त आहे. त्यातच अनेक भागात टँकर पोहोचेत नसल्याने विकतचे पाणी घेवून नागरिकांना जगण्याची वेळ आली आहे.

विकतच्या पाण्यावर नागरिकांची भागतेच तहान
तापीनदी बंधार्‍यात जलसाठा असतानाही शहराला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. शहरात पालिकेचे चार ते सहा टँकर आहेत मात्र ते टंचाईच्या तुलनेत अत्यल्प आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून सर्व भागांना टँकरव्दारे पाणीपुरवठा होणे अपेक्षीत आहे मात्र यातही दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे बर्‍याच भागांतील नागरिकांना टँकर विकत घेवून तहान भागवावी लागत आहे.


35 टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा
शहरातील तापीनदीत पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजन नसल्याने कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. शहरात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. पालिकेच्या माध्यमातून सहा तर माजी नगरसेवक, समाजसेवकांच्या माध्यमातून 35 टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. दिवसभरात टँकर भरण्यासाठी रांगा लागत असल्याने आता रात्रीच्या वेळीही नागरिकांना टँकरमधून पाणी भरावे लागत आहे. शहरातील पालिका हद्दीबाहेरील भागांना यापूर्वी टँकरची गरज भासत नव्हती. यंदा मात्र हे प्रमाण वाढले आहे. दरम्यान टँकर वितरणातही दुजाभाव केला जात आहे. राजकिय दबावातून काही विशिष्ट भागांनाच टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित भागांमध्ये नागरिकांनी पालिकेला संपर्क करुनही टँकर मिळत नाही, असा उघड आरोप नागरिकांचा आहे.

12 दिवसांआड मिळते पाणी
शहरात रोटेशननुसार 10 दिवसांनी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र शहरातील दक्षिण भागाला 12 दिवसाआड पाणी मिळते. काही भागात केवळ चार तास तर काही भागांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा केला जातो. काही माजी नगरसेवकांनी परस्पर मेन रायझींगला जोडणी केली तर काहींनी व्हॉल्व्ह बुजवून टाकले. समान वितरण पध्दतीने पाणी वाटपासाठी पालिका प्रशासन मात्र लक्ष देत नाही, असादेखील आरोप आहे.

सार्वजनिक विहिरींची पातळी खालावली
टंचाईच्या काळात शहराला जून्या नगरपालिका कार्यालयातील ब्रिटीशकालीन विहिर संजीवनी ठरते. याच विहिरीवरुन टँकर भरुन शहरात पाणीपुरवठा केला जातो मात्र आता उन्हाळ्यात या विहिरीची जलपातळी देखील दोन फुटापर्यंत घसरली आहे. यामुळे या ठिकाणी टँकर भरण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील विहिरीचीही जलपातळी खालावली आहे तर येथेदेखील दिवसभर टँकर भरण्यासाठी गर्दी होत आहे.

जीर्ण पाईप लाईनची डोकेदुखी
भुसावळातील रॉ वॉटरची मेन रायझींग 1958 सालची आहे. बीड, सिमेंट तर कोठे पीव्हीसी पाईपचा वापर करण्यात आला आहे. अनेकदा पाईप लाईन फुटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर शुद्ध पाण्याचा अपव्यय होतो. पालिकेने पाण्याचा दाब वाढताच अनेकदा पाईप लाईन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होवून तो रोटेशन पुढे ढकलले जाते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !