पीक विम्यासाठी पात्र मंडळांमध्ये यावल तालुक्याचा तत्काळ समावेश करा

अमोल जावळे यांचे पुराव्यानिशी जळगाव जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


फैजपूर : पीक विम्यासाठी पात्र असलेल्या महसूल मंडळामध्ये यावल तालुक्यातील एकही मंडळाचा समावेश नोंदी घेणार्‍या खाजगी कंपनीच्या चुकीमुळे समाविष्ट झालेला नाही. शंभर टक्के केळी पट्ट्यातील ही मंडळे तत्काळ पीक विम्यासाठी पात्र ठरावी व स्वयंचलित हवामान केंद्राच्या यंत्रांची तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी तालुक्यातील सर्व स्वयंचलित हवामान केंद्राना भेटी देत व तेथील परीस्थितीचा आढावा घेत पुराव्यानिशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समिती यांना दिले आहे.

सलग पाच दिवश 45 अंश तापमान गेल्यास भरपाई देय
संचालक (पिक विमा) केंद्रिय कृषि मंत्रालय यांचे स्वयंचलित हवामान यंत्र संदर्भातील 1 मार्च 2012 रोजीचे पत्र व मार्गदर्शक सूचने अन्वये हवामानावर आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत असलेल्या निकषांमध्ये 1 मे ते 31 मे या कालावधीत सलग 5 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 45 अंश किंवा जास्त तापमान राहिल्यास शेतकर्‍यांना 43 हजार 500/- प्रती हेक्टर एवढी नुकसान भरपाई देय आहे.

यावल तालुक्यावर अन्याय
यावल तालुक्यातील एकही महसूल मंडळ जास्त तापमानाचे निकषांमध्ये पात्र झालेले नाही. याबाबत शेतकर्‍यांसमवेत सविस्तर चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की, यावल तालुक्यातील बहुतांश स्वयंचलित हवामान यंत्र केंद्र हे शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बसविलेले नाहीत. (उदा- बहुतांश स्वयंचलित हवामान केंद्रांच्या ठिकाणी मोठी झाडे, पीक लागवड, आजूबाजूस इमारती व रहिवासी वस्ती आहे. सोबतच स्वयंचलित यंत्राची देखभाल व दुरुस्ती योग्य रित्या झालेली दिसत नाही) या तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी उच्च तापमानाची नोंद झाली नाही. ममुराबाद येथील हवामान केंद्र देखील जिल्ह्याचे सरासरी तापमान हे 45 अंश सलग 7-8 दिवस असल्याबाबतची नोंद झाली आहे.

तांत्रिक चुकीचा शेतकर्‍यांना फटका
ही चूक तांत्रिक असून यात शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागू नये याकरिता सकारात्मक निर्णय घेऊन तत्काळ विमा कंपनीस यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळात 43 हजार 500 प्रति हेक्टर नुकसान भरपाईच्या निकषात पात्र करण्याबाबत लेखी आदेश द्यावेत तसेच सर्व स्वयंचलित हवामान यंत्रांची तात्काळ तपासणी करण्यात यावी, जेणेकरून यापुढे कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समिती, जळगाव यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी दिले आहे.


कॉपी करू नका.