संत मुक्ताई चरणी हजारो भाविक नतमस्तक
मुक्ताईनगर : आषाढी एकादशीनिमित्त जे भाविक पंढरपूर जावू शकले नाहीत अशा हजारो भाविकांनी श्री मुक्ताई चरणी नतमस्तक होवून दर्शन घेतले. बुधवारी पहाटे महापूजा करण्यात आल्यानंतर आरती करण्यात आली. हजारो भाविकांच्या गर्दीने आईसाहेब मुक्ताई मंदिर व परिसर दुमदुमला होता. मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आईसाहेब मुक्ताईंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. मंत्री रक्षा खडसे यांच्यावतीने 11 फुटाची भव्य अगरबत्ती आईसाहेबांपुढे लावण्यात आली.
आई मुक्ताईला मोसंबीची आरास
आईसाहेब मुक्ताईला नितीन रघुनाथ चौधरी (रा.कोथळी) यांच्याकडून त्यांच्या शेतातील मोसंबीची आरास करण्यात आली. या आरासने सर्व भाविकांचे लक्ष वेधले. भाविकांसाठी शरद पाटील (रा.बोदवड) व राजु पानकर (रा.मलकापूर) यांच्याकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली. पोलीस प्रशासनानेही सहकार्य करुन आपले योगदान दिले. चातुर्मासातील ही पहिली एकादशी असल्याने या एकादशीला विशेष महत्त्व आहे.