फागणे ग्रामविकास अधिकार्‍यासह चौघे धुळे एसीबीच्या जाळ्यात

अद्यावत उतारा देण्यासाठी चार हजारांची लाच भोवली : ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ


धुळे : घरासाठी अद्यावत नमूना नंबर आठचा उतारा देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना धुळे जिल्ह्यातील फागणे येथील ग्रामविकास अधिकार्‍यासह सरपंच पती, शिपाई व रोजगार सेवकाला धुळे एसीबीने गुरुवारी दुपारी अटक केली. एकाचवेळी चौघा लाचखोरांवर कारवाई झाल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या लाचखोरांवर झाली कारवाई
अटकेतील आरोपींमध्ये ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील (47, रा. प्लॉट नंबर 16, नवनिधी, गोंदूर रोड, होम साई ट्रेनिंग सेंटरच्या मागे, संस्कृती कॉलनी, वलवाडी, देवपूर, धुळे), सरपंच पती नगराज हिलाल पाटील (48, शनी मंदिराजवळ, फागणे), ग्रामपंचायत शिपाई किरण शाम पाटील (30, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामागे, फागणे), रोजगार सेवक पितांबर शिवराम पाटील (43, रा.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ, फागणे, ता.जि.धुळे) यांचा समावेश आहे.

असे आहे लाच प्रकरण
49 वर्षीय तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली. घर नमुना आठच्या उतार्‍यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देणे करीता तक्रारदार यांच्याकडे संशयीत आरोपींनी 16 व 18 रोजी पाच हजारांची लाच मागितल्यानंतर त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व पडताळणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व अन्य आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, नाईक संतोष पावरा, कॉन्स्टेबल बारेला, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.