आयजी पथकाची मोठी कामगिरी : मुक्ताईनगरात 76 लाखांचा कंटेनरभर गुटखा जप्त

मुक्ताईनगर : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीवरून मुक्ताईनगरजवळ तब्बल 76 लाखांचा कंटेनरभर गुटखा जप्त केल्याने गुटखा माफिया हादरले आहेत. शनिवार, 20 जुलैला पहाटे सहा वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील बर्हाणपूर चौफुलीजवळ संशयित कंटेनर (एच.आर. 55 एक्यू.3873) मधून हा गुटखा जप्त करण्यात आला. कोटा येथून सोलापूरकडे या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची कंटेनरमधून वाहतूक होणार असल्याची माहिती आयजींच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. शनिवारी पहाटे कंटेनर येताच त्याची तपासणी करण्यात आली. त्यात राजनिवास पानमसाला, झेड वन झिरो वन ज्फरानी नावाचा गुटखा मिळाला.
पोलिस पथकाने कंटेनर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून त्यामधील गोण्यांची तपासणी केल्यानंतर 76 लाख 17 हजार 800 रुपये किंमतीचा राजनिवास पान मसाला व झेड वन झिरो वन ज्फरानी जर्दा नावाचा पान मसाला जप्त करण्यात आला. अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या गुटख्याचा कंटेनर कोटा (राजस्थान) येथून गुटखा घेऊन महाराष्ट्रातील सोलापूरकडे विक्री करण्यासाठी जात होता.
याप्रकरणी आयजींच्या पथकातील पोलिस नाईक प्रमोद मंडलिक यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक लियाकत अली इस्लाम खान (रा. हरियाणा), मालक दिलीप बदलानी (रा.जळगाव), संतोष शर्मा (रा.दिल्ली), त्यागी (जयपूर), मुबारक, नीलू पंजाबी (रा.भिवाडी, राजस्थान) अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालक लियाकत अली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई
विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, हवालदार तुषार पाटील, हवालदार विक्रांत मांगडे, हवालदार विजय बिलगे, पोलीस नाईक प्रमोद मंडलिक, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


