पारोळ्यासह पाचोरा, धरणगावातील बँकांबाहेर लाखोंची रोकड चोरी : एमपीच्या टोळीतील म्होरक्या एलसीबीच्या जाळ्यात


जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करीत पारोळा, पाचोरा व धरणगाव शहरातील बँकांबाहेरून ग्राहकांकडील बॅग अलगदपणे लांबवून लाखोंची रोकड लूटणार्‍या टोळीतील म्होरक्याला अटक केली आहे. आरोपीकडून तीन लाख 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. वसंत बनवारीलाल सिसोदया (30, रा.कडीयागाव, ता.पचोर, जि.राजगढ, राज्य मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

एलसीबीला मिळाली होती गोपनीय माहिती
जळगाव जिल्ह्यात बँकेसमोरून व गर्दीच्या ठिकाणाहून पैशांच्या बॅगा लांबवण्यात आल्याने याप्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपींचा कसून शोध सुरू होता. काही दिवसांपूर्वी पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोरून पैशांची बॅग लांबवण्यात आल्यानंतर भामटे पुन्हा त्याच परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती कळवली.

पथकाने सापळा रचून केली अटक
निरीक्षक आव्हाड यांच्या सूचनेनंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने रविवार, 21 जुलै रोजी दुपारी दोनवाजता सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. त्याच्याकडून तीन लाख 18 हजार रुपयांची रोकड मिळून आली.

दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया (दोन्ही रा.गूलखोडी ता.पाचोर, जि.राजगढ) यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान टोळीतील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगून पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. यापूर्वी त्यांनी पाचोरा, धरणगाव आणि जिल्ह्यातील एक इतर परिसरात चोरी केल्याचे देखील सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपासार्थ पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.