13 दिवसांचा प्रवास : नेपाळ बस दुर्घटनेमुळे आठव्या दिवशी विघ्न
भुसावळ (25 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील 90 भाविक एकूण 13 दिवसांच्या सहलीसाठी वरणगावातून निघाले होते. शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांनी भुसावळ ते प्रयागराज असा प्रवास सुरू केला. यानंतर प्रवासात असताना आठव्या दिवशी शुक्रवार, 23 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता त्यांना भीषण अपघाताला सामोरे जावे लागले.
27 जणांच्या आयुष्यातील प्रवास ठरला अखेरचा
16 ऑगस्टला प्रवास सुरू केल्यावर भाविक दुसर्या दिवशी 17 ऑगस्टला प्रयागराज येथे पोहोचले. तेथे त्रिवेणी संगमावर दर्शन घेऊन रात्री चित्रकुटला मुक्काम केला. तिसर्या दिवशी 18 ऑगस्टला पुन्हा चित्रकुट फिरून रात्रीचा प्रवास करून सर्व जण 19 ऑगस्टला अयोध्येत पोहोचले. तेथे दर्शन घेऊन रात्रीचा मुक्कामदेखील अयोध्येत करण्यात आला. यानंतर मंगळवार, 20 ऑगस्टला पहाटे गोरखपूरकडे प्रवास सुरू करण्यात आला. तेथे गोरक्षनाथ दर्शन घेऊन रात्री मुक्काम करण्यात आला. 21 ऑगस्टला पहाटे सर्व जण पोखराकडे निघाले. तेथे लुम्बिनी मातेचे व पोखरा दर्शन घेतल्यानंतर रात्रीचा मुक्काम करण्यात आला. 22 ऑगस्टला पहाटे चार वाजता मनोकामना मातेचे दर्शन घेऊन गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या दोन खाजगी बसेसने काठमांडूकडे प्रवास सुरू केला मात्र हा प्रवास 90 पैकी 27 जणांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. या दुर्घटनेमुळे 23 ते 28 ऑगस्टदरम्यान नियोजित पुढील प्रवास स्थगित करावा लागला.





…तर असा झाला असता प्रवास !
ही दुर्घटना झाली नसती तर भाविकांचा हा जथ्था 23 ऑगस्टला काठमांडू येथे मुक्काम करून 24 ऑगस्टच्या पहाटे चितवण येथे मुक्कामासाठी निघणार होता. तेथून 25 ऑगस्टला जनकपूर, 26 रोजी बुद्धगया, 27 ऑगस्टला काशी येथे मुक्काम करून 28 ऑगस्ट रोजी पुन्हा काशी दर्शन करून परतीचा प्रवास सुरू झाला असता मात्र नियतीला मनात कदाचित काही वेगळेच मंजूर असावे !
