नेपाळ बस अपघातातील 25 मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : जळगावात मुख्यमंत्र्यांची घोषणा


5 lakh aid to the heirs of 25 deceased in Nepal bus acciden t: Chief Minister announced in Jalgaon जळगाव (25 ऑगस्ट 2024) : जळगाव जिल्ह्यातील 25 भाविकांचा नेपाळ बस अपघातात मृत्यू झाला होता. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात जाहीर केली. रविवारी जळगावात आयोजित ‘लखपती दीदी’ या कार्यक्रमात बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यातील 25 भाविकांचा मृतयू
भुसावळसह तालुक्यातील वरणगाव, तळवेल तसेच परिसरातील 90 भाविक हे नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर भाविकांची एक बस नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने कोसळली होती. या अपघातात गोरखपूरच्या चालक-वाहकासह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मन हेलावणारा हा अपघात शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला होता. या अपघातात एक तरुणी बेपत्ता असून अन्य 16 भाविक जखमी झाले आहेत.

केंद्रातर्फे दोन लाखांची
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या अपघातामध्ये मयत झालेल्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर आता राज्य सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी या कार्यक्रमात नेपाळमधील बस अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे आता केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने देखील अपघातातील मयतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.


कॉपी करू नका.