आमदार एकनाथ खडसेंची आमदार चंद्रकांत पाटलांवर खोचक टिका ; म्हणाले सरड्यासारखे रंग….!

मुक्ताईनगर (6 सप्टेंबर 2024) : एकनाथ खडसे हे सरपटणारे, रंग बदलणारे प्राणी असल्याची टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर केली होती. या टीकेचा आमदार खडसे यांनी खरपूस समाचार घेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
आमदार खडसे यांची खोचक टीका
आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे नीतीमत्ता तरी आहे का? चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा अध्यक्ष होता. निवडणुकीमध्ये तो अपक्ष उभा राहिला. त्यानंतर शरद पवार यांच्या मदतीने निवडून आला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये तो उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला. कालांतराने पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
रंग कुणी बदलले ?
राष्ट्रवादीच्या जीवावर आमदार झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे गेला. आता म्हणतो मी शिंदेंचा आहे. त्यामुळे सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वाद हा सर्वश्रूत आहे. त्यांच्यात सातत्याने राजकीय कुरघोड्या सुरू आहे. त्यातच आमदार पाटील यांच्या टिकेला आमदार खडसे यांनी उत्तर दिल्यानंतर पुन्हा या नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील हेदेखील तितकेच खरे !


