शेअर ट्रेडींगमध्ये जळगावच्या प्राध्यापिकेला एक कोटींचा गंडा : हरियाणातील भामट्यांना बेड्या

जळगाव सायबर सेल पोलिसांची यशस्वी कामगिरी : साडेसहा लाखांची रोकड जप्त


जळगाव (8 सप्टेंबर 2024) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर लाभ होईल, असे आमिष दाखवून जळगावातील एका प्राध्यापिकेची एक कोटींची फसवणूक करण्यात आली होती. जळगाव सायबर सेल पोलिसात गुन्हा दाखल होताच तांत्रिक विश्लेषणाअंती हरियाणातून दोन भामट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव शहरातील एका प्राध्यापक महिलेला 16 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान एका व्हॉट्सऊपच्या ग्रुपवर अज्ञात आरोपींनी जोडत अंजली, जय, डॉ. बेहरुज नाव सांगणार्‍या भामट्यांनी मेसेज पाठवून ट्रेंडिंगमध्ये रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेसह तिच्या पतीचे, नणंदेच्या व सासूच्या खात्यावरून वेळोवेळी एक कोटी पाच लाख 23 हजार 341 रुपये स्वीकारण्यात आले मात्र फसवणूक झाल्याची खात्री होताच तक्रार नोंदवण्यात आली.

आतापर्यंत चार आरोपींना अटक
पोलिसांनी या गुन्ह्यात दोन आरोपींना गजाआड केले असून अन्य दोघे हरियाणात असल्याचे कळताच त्यांनाही अटक करण्यात आली. मुकेश सुभाष (26) व अंकुश सतपाल (27, दोघे रा.नाधोरी, ता.भुना, जि.फतेहबाद, हरियाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हेड कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले, शिवनारायण देशमुख, कॉन्स्टेबल दीपक सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान, आरोपींची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.


कॉपी करू नका.