दोंडाईचा येथील डॉ. शैलेश देशपांडे यांना भारत बेस्ट अवॉर्ड पुरस्कार प्रदान


दोंडाईचा (9 सप्टेंबर 2024) : जयपुर राजस्थान येथे संपन्न झालेल्या एस्ट्रो सोसायटीतर्फे ज्योतिष अधिवेशन अतिशय उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजक पंडित भारद्वाज जी यांनी केले होते. संपूर्ण भारतातून विद्वान ज्योतिष अभ्यासक उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वविख्यात ज्योतिर्विद श्री अजय भांबेजी, पं. भारद्वाज जी यांचेहस्ते करण्यात आले.

यावेळी मध्यप्रदेश माजी मंत्री दिक्पाल राजपाल, महामंडलेश्वर राजकुमार अग्रवाल इंदोर, प्रोफेसर डॉ. दिवाकरण कोची, डॉ. भीमप्रकाश दधिच जोधपुर, आचार्य शिवकुमार अग्रवाल, पंडित नरेंद्र सरण मारवर, सुमन अत्री हरियाणा, कथावाचक गोवत्स मोहित मुदगलजी, डॉ. शैलेश देशपांडे दोंडाईचा असे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटनानंतर आयोजक भारद्वाज जी यांनी अनोख्या पद्धतीने चर्चासत्राला सुरुवात केली अतिशय सुंदरतेने विषयास सुरुवात करून भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र व ज्योतिष शास्त्र याची सांगड घालण्यास सुरुवात केली व हळूहळू त्यामध्ये उपस्थित ज्योतिर्विद भगवान श्रीकृष्ण चरित्र व ज्योतिष शास्त्र यांची उत्तम उदाहरणे व दृष्टांत देऊन ज्योतिष शास्त्र हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित केले. यामध्ये दोंडाईचा येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्विद डॉ. शैलेश देशपांडे यांनी आपल्या अनोख्या वाणीने आपले विचार मांडून उपस्थितांचे मन जिंकले. भगवान श्रीकृष्ण यांना जितके अभ्यासू तितके त्याचे नवीन पैलू आपल्यासमोर येतात. प्रत्येकास असे वाटते की, भगवान श्रीकृष्ण हे माझ्यासोबत आहेत. ही भ्रामक कल्पना महाभारताच्या युद्धाच्या वेळेला कौरवांना होती परंतु संपूर्ण सैन्य कौरवांकडे होते तर श्रीकृष्ण भगवान हे फक्त पांडवांकडे होते. यास कारण असे होते की भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत..? असा प्रश्न मनात पडला तर त्याचे उत्तर अतिशय सोपं आहे की, ज्या ठिकाणी सत्य आहे, धर्म आहे, धर्माचरण आहे त्याच ठिकाणी मी आहे असे साक्षात श्रीमद् भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहे. म्हणून महाभारताचे युद्ध हे अधर्मा विरुद्ध धर्माचं होतं व धर्माचं रक्षण करण्याची ध्वजा पांडवांनी झेलली होती म्हणून भगवान श्रीकृष्ण साक्षात अर्जुनाचे सारथी होऊन या युद्धाचे नैपथ्य करत होते. एवढंच नव्हे जीवन नेमकं काय आहे याचे अलौकिक दर्शन अर्जुनास श्रीमद् भगवद्गीता याच्या आलोकीक प्रवचनाने अर्जुनास समजून सांगितले व त्याच वेळेला या भूतलावर असलेले सर्व शास्त्र यावर माझंच अधिपत्य आहे हे त्यांनी एकदा पुन्हा अधोरेखित केलं आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्र सुद्धा हे भगवान श्रीकृष्णाची देण असून हे शास्त्र लोकांच्या कल्याणासाठी आहे, मार्गदर्शनासाठी आहे, सेवे करता आहे , हे प्रत्येक ज्योतिष अभ्यासाकाने लक्षात घेऊन पृच्छकास मार्गदर्शन जर केलं तर भगवान श्रीकृष्ण हे पांडवांसारखे आपल्या जवळ असतात हे वेगळं सांगायला नको असे प्रतिपादन आपल्या व्याख्यानात डॉ. शैलेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित ज्योतिर्विदांना सन्मानित करण्यात आले. यात भारत बेस्ट अवॉर्ड याचेही वितरण झालं. यामध्ये दोंडाईचास्थित, सर्वांना सुपरिचित असलेले ज्योतिर्विद डॉ. शैलेश देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं एक विशेष स्वरूप आणि महत्त्व आहे ते असे राजस्थानातील जयपूर सिटी मध्ये जसे लोक पर्यटना करता जातात तसेच काही ज्ञाते लोक जयपूर येथे ज्योतिष अभ्यासकांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. कारण जयपुर या शहरांमध्ये विविध ज्योतिष शाखा अभ्यासक असून, यात अभ्यासू, अनुभवी , पारंगता मिळवलेले अशी आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. उत्तम ज्योतिष अभ्यासकांचा या ठिकाणी विशेष वर्ग आपणास आढळतो. अशा या विद्वान जयपुर स्थित ज्योतिर्विदां तर्फे हा पुरस्कार दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे स्वतः कार्यक्रमाचे आयोजक पंडित भारद्वाजी करत होते. अतिशय नीटनेटक्या व नियोजनबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करून उपस्थितांना सन्मानित करण्यात आले….


कॉपी करू नका.