गुजरातच्या व्यापार्याला धुळे तालुक्यात मारहाण करीत लूटले : दोघांना बेड्या
धुळे तालुका व गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी : सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त
Gujarat businessman beaten and robbed in Dhule taluka : Both in chains धुळे (9 सप्टेंबर 2024) : स्क्रॅपमधील कॉपर केबल स्वस्तात देण्याच्या बहाण्याने गुजरातच्या व्यापार्याला बोलावून संशयीतांनी त्यास बेदम मारहाण करीत सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लूटल्याची धक्कादायक घटना गुरुवार, 5 रोजी सायंकाळी धुळे तालुक्यातील सडगाव शिवारात घडली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात नऊ संशयीतांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे गुन्हे शाखा व धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत बारकाईने गुन्ह्याचे अवलोकन करीत या गुन्ह्यात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कलीम मॅनेजर भोसले (43, हेंकळवाडी, ता.धुळे) व रघवीर कलपत भोसले (29, हेंकळवाडी, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे फसवणूक प्रकरण
गुजरातच्या वडोदर्यातील स्क्रॅप खरेदी-विक्री व्यापारी कुणाल मणिलाल पटेल (37, न्यू समा रोड, वडोदरा, गुजरात) यांच्याशी नितीन भोसले नामक संशयीताने स्क्रॅप कॉपर वायर विक्री संदर्भात संपर्क साधला व स्क्रॅप माल असल्याबाबतचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर व्यवहार निश्चितीसाठी 5 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. पटेल यांच्यासह तीन सहकारी गुरुवार, 5 रोजी कार (जी.जे.09 बी.डी.0657) देवपूर बसस्थानकावर आले व संशयीताने त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवत त्यावर येण्यास सांगितले. सडगावकडे जात असताना दुचाकी (एम.एच.18 ए.यु.8226) वरील दोन संशयीतांना पाठीमागे येण्याचे सूचित केले. हेंकळवाडी आल्यानंतर व्यापार्यांना लूटीचा संशय आल्याने त्यांनी मौल्यवान ऐवज एका बॅगेत टाकला व त्याचवेळी दुचाकीवरील दोन संशयीतांनी चारचाकीला आपले वाहन आडवे लावले व त्याचवेळी लपून बसलेल्या 7 ते 8 संशयितांनी कारमधील विशाल पटेल, आदित्य पटेल, विनय पटेल, तीर्थ पटेल या सर्वांना गाडीबाहेर काढून जबर मारहाण केली तसेच खिशामधून मोबाईल, सोन्याची अंगठी, अमेरिकन डायमंडची अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट, गाडीत ठेवलेली रोकड याशिवाय क्युआर कोडद्वारे बळजबरीने पैसे काढून एकूण सहा लाख 46 हजार 900 रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला.





यांनी उघडकीस आणला गुन्हा
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक विजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, हवालदार हेमंत बोरसे, हवालदार मच्छिंद्र पाटील, हवालदार योगेश चव्हाण, हवालदार प्रल्हाद वाघ, कॉन्स्टेबल नितीन धीवसे, धुळे तालुक्याचे हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार उमेश पवार, कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल कुणाल शिंगणे, कॉन्स्टेबल सनी सांगळे आदींच्या पथकाने उघडकीस आणला.
