धुळे शहरातील अट्टल चोरट्यांकडे सापडले गावठी पिस्टल, जिवंत काडतूस
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बिलाडी रोडवरील घरफोडीची उकल
धुळे (11 सप्टेंबर 2024) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणार्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूसासह घरफोडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. हरीष उर्फ कैलास सनी चौधरी (23, नवीन बसस्थानकासमोर, वीटभट्टी, देवपूर, धुळे), राहुल वाल्मीक सूर्यवंशी (22, नवीन बसस्थानकासमोर, वीटभट्टी, देवपूर, धुळे) व हेमंत कैलास जगताप (19, पाटीलवाडा, देवपूर धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बिलाडी रोडवरील घरफोडीची उकल
धुळ्यातील एकता नगर, बिलाडी रोड भागातील रहिवासी भावेश मिलिंद जोशी यांच्या बंद घरातून बेन्टेस नेकलेससह साडेसहा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी घरफोडी झाल्याने धुळ्यात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेकडून समांतर तपासादरम्यान संशयीतांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली तसेच 40 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, पाच हजार पाचशे रुपयांची रोकड मिळून एकूण 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हरीषविरोधात देवपूर पोलिसात तीन तर राहुल सूर्यवंशी विरोधात सोनगीर व देवपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.





