धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दहा लाखांच्या चोरीच्या अॅल्युमिनियम तारेसह शहाद्यातील दोघे जाळ्यात
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा गुन्ह्यांची उकल : पसार संशयीतांचा कसून शोध
Big action of Dhule Crime Branch : Two people from Shahada caught with stolen aluminum wire worth ten lakhs धुळे (13 सप्टेंबर 2024) : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील वीज कंपनीच्या अॅल्युमिनियम तारेची चोरी करणार्या शहाद्यातील भंगार विक्रेत्यासह दोघांना धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 10 लाख 30 हजार 640 रुपये किंमतीच्या अॅल्युमिनियम तारा व केबल जप्त करण्यात आली. आरेापींच्या अटकेनंतर धुळे जिल्ह्यात एक तर नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी गुन्हे करताना अन्य तीन साथीदारांची मदत घेतल्याने त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोरीच्या अॅल्युमिनियम तारेची विक्री होणार असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर शहाद्यातील भंगार व्यावसायीक आसीफ हनी शहा (41, गरीब नवाज कॉलनी, सिद्धीकी चौक, शहादा) व त्याचा साथीदार गोपाल काशीनाथ ठाकरे (20, मु.पो.भादा, ता.शहादा) यांना छोटा हत्ती वाहन (एम.एच.04 जी.एफ.2714) सह ताब्यात घेण्यात आले. संशयीतांच्या चौकशीत त्यांनी नजीम अकबर शहा (24, गरीब नवाज कॉलनी, शहादा), धनराज भील (शहादा) यांचाही चोरीत सहभाग असल्याची कबुली दिली तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अॅल्युमिनियम तारा व केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून अडीच लाख रुपये किंमतीच्या छोटा हत्ती वाहनासह 10 लाख 30 हजार 640 रुपये किंमतीच्या अॅल्युमिनियम तारा व केबल जप्त करण्यात आली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहा.निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदेसिंग चव्हाण, संदीप सरग, प्रकाश सोनार, संतोष हिरे, किशोर पाटील, गुणवंत पाटील, अतुल निकम, विवेक वाघमोडे आदींच्या पथकाने केली.