आधी आवळला गळा नंतर पोल्ट्री फार्म आवारात फेकला मृतदेह : नवापूरातील विवाहितेच्या खुनाची उकल
जात पंचायतीत तक्रारीचा राग : पती, दीरासह तिघांना बेड्या : 24 तासात गुन्ह्याची उकल करण्यात नवापूर पोलिसांना यश ः आरोपींना सात दिवसांची कोठडी
First the throat was slit, then the body was thrown in the poultry farm premises : The murder of the married woman in Nawapur is solved. नवापूर (14 सप्टेंबर 2024) : कौटूंबिक वादाची तक्रार खाटीक जमातीत केल्याच्या रागातून सख्ख्या दीराने 32 वर्षीय वहिनीची गळा आवळून हत्या करीत मृतदेहाची मित्राच्या मदतीने विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर शहरातील आदर्श नगरात गुरुवार, 12 रोजी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. नवापूर पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर मयताच्या पती, दीरासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. रुकसाना आसीफ खाटीक (32) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
खून करून पोल्ट्री फार्मनजीक फेकला मृतदेह
नवापूरच्या आदर्श नगरातील चिकन विक्री व्यावसायीक आसीफ छोटु खाटीक (35) यांनी 11 रोजी पत्नी रुकसाना हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी मिसींग दाखल करीत तपासाची चके्र फिरवली असता रुकसाना यांच्या घराजवळ 11 रोजी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान एक कार दिसून आल्यानंतर पोलिसांनी तपास करीत कार (क्रमांक एम. एच. 04 एफ. एफ. 5035) निष्पन्न केली व या कारमध्ये विवाहितेचा दीर तौसीफ छोटु खाटीक व त्याचा मित्र संतोष बाला गावीत असल्याचे कळताच तौसीफ यास गुरुवारी ताब्यात घेवून बोलते करण्यात आले. नात्याने वहिनी असलेल्या रुकसाना यांनी धुळे जमातीत सासरच्या लोकांची तक्रार केली व त्यात आपले नाव टाकल्याचे कळाल्याने आरोपीने विवाहितेच्या घरी येत जाब विचारला व वाद वाढल्याने विवाहितेची गळा आवळून हत्या केली व मृतदेहाची मित्राच्या मदतीने विल्हेवाट लावल्याची कबुली आरोपीने दिली.
खाडकुँवामध्ये टाकला मृतदेह
बुधवार, 11 सप्टेंबर रोजी आरोपी तौसीफ खाटीक याने विवाहिता रुकसाना यांचा आदर्श नगरातील दोन्ही हाताने गळा दाबल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री केली व संशयीत संतोष गावीतच्या मदतीने मृतदेह दोन पांढर्या रंगाच्या प्लॉस्टीकच्या गोणीत टाकून कारद्वारे करंजी ते भवरे रोडवरील मोहंम्मद अब्दुल आमलीवाला यांच्या मालकीच्या पोल्ट्रीफार्म जवळील खाडकुँवामध्ये टाकून दिला. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत त्याची ओळख पटवली.
पती, दीरासह तिघांना अटक
हवालदार दादाभाऊ वाघ यांच्या फिर्यादीवरुन छोटू खाटीक व संतोष बाला गावीत यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांच्या तपासात सहा आरोपी निष्पन्न झाले असून विवाहितेचा पती व संशयीत आसीफ छोटू खाटीक यास अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत. अटकेतील आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने 19 पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली गुन्ह्याची उकल
नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पो.ह. दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, दिनेशकुमार वसुले, कैलास तावडे, गणेश बच्छे, संदिप सोनवणे, दीपक पाटील, विजय पवार, मोगी पावरा आदींच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली.
आरोपींविरोधात हवी कठोर कारवाई : समाजाची मागणी
खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी नवापूर येथील समस्त खाटीक समाज बांधवांनी नवापूर पोलीस प्रशासनाकडे केली. निवेदनावर सादीक, आरीफ भाई, हरफाम भाई, हारून भाई, ईरफान भाई, इलियास भाई आदींच्या स्वाक्षर्या आहेत.