दसवेल फाट्यानजीक भीषण अपघात : ईको चालकासह पाच भाविक ठार

मयत शिंदखेडा व वारूड गावातील रहिवासी : भरधाव पिकअपची इको वाहनाला धडक


Fetal accident near Dasvel Fata : Five devotees killed along with Eco driver शिंदखेडा (15 सप्टेंबर 2024) : नरडाणा येथे भागवत कथेच्या कार्यक्रमावरून शिंदखेडा शहराकडे निघालेल्या भाविकांच्या इको वाहनाला भरधाव पिकअपने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात इको चालकासह पाच भाविकांचा मृत्यू झाला. हा अपघात शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला. मृतांमध्ये शिंदखेड्यातील चौघांचा तसेच वारूड येथील इको चालकाचा समावेश आहे.

पाच भाविक ठार : शिंदखेडा भागात शोककळा
शिंदखेडा व वारूड भागातील भाविक नरडाणा येथे भागवत कथेसाठी गेल्यानंतर रविवारी पहाटे दोन वाजता कार्यक्रम आटोपून इको व्हॅनद्वारे गावाकडे निघाल्यानंतर दसवेल फाट्याजवळ भरधाव माल वाहतूक करणार्‍या बोलेरो पिकअपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात इको चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल तर चौघे गंभीर जखमी आहेत. जागीच मृत्यू झालेल्यांमध्ये शिंदखेडा शहरातील तीन महिला तसेच शिंदखेडा व वारूड येथील प्रत्येकी एका तरुणाचा समावेश आहे. चौघा गंभीर जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यांचा ओढवला मृत्यू
भीषण अपघातातील मयतांमध्ये इको चालक जयेश गुलाब बोरसे (23, बोरसे, वारूड), मंगलाबाई लोटन देसले (59, शिंदखेडा), मयुरी पितांबर परदेशी (27, शिंदखेडा), विशाखा (वृषाली) आप्पा माळी (17, शिंदखेडा), सुनील दंगल कोळी (32, परसामळ, शिंदखेडा) यांचा समावेश आहे. या अपघात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

मद्यधूंद चालकामुळे अपघात
अपघात इतका भयंकर होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नरडाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश मोरे व सहकार्‍यांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

 

 


कॉपी करू नका.