कोल्हापूरच्या उद्योजकाला ‘डिजिटल अ‍ॅरेस्ट’ दाखवत 81 लाखांचा गंडा

0

81 lakhs scam showing ‘digital arrest’ to Kolhapur businessman कोल्हापूर (15 सप्टेंबर 2024) : सायबर भामट्यांकडून फसवणुकीचे नव-नवीन फंडे समोर येत असताना कोल्हापूरातूनही अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत एनआयएमधून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी कोल्हापूरच्या उद्योजकाला 81 लाखांचा चुना लावला. हा प्रकार 6 ते 11 सप्टेंबर दरम्यान घडला. याबाबत उद्योजकाने शुक्रवारी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला.

डिजिटल अ‍ॅरेट दाखवत दाखवली भीती
कोल्हापूरच्या उद्योजकास शुक्रवार, 6 सप्टेंबरला व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. एनआयएचे अधिकारी असल्याचे सांगत त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार एका गंभीर गुन्ह्यात तुम्हाला ऑनलाईन अटक केल्याचे सांगितले. ‘हैदराबाद येथील एका व्यक्तीने दहशतवादी समुहाला 122 कोटी रुपयांची मदत केली आहे. या पैशांमधून दहशतवाद्यांनी शस्त्रे खरेदी केली आहेत. या व्यवहारात तुमच्या बँक खात्यात 20 ते 22 कोटी रुपये वर्ग झाले असल्याचे सांगून हा देशविरोधी गंभीर गुन्हा असल्याने एनआयएचे अधिकारी तुमच्या अवतीभवती वावरत आहेत. तुमच्यावर करडी नजर असून, कोणत्याही क्षणी ते तुम्हाला संपवू शकतात. तुमच्या जिवाला धोका असल्याने जवळच्या एका हॉटेलमध्ये जाऊन आमच्या ऑनलाईन अटकेत राहा,’ असे सांगून त्याने उद्योजकास भीती घातली.

फोन थांबताच झाली फसवणुकीची खात्री
उद्योजकाला भामट्यांनी बरदस्तीने शिवाजी पार्क येथील एका हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले व गुन्ह्यातून सुटका करून घेण्यासाठी बँक खात्यावर 81 लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करून घेतले. भीतीपोटी उद्योजकाने त्यांच्या बँक खात्यातील 81 लाख रुपये संशयिताच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर संशयितांचे फोन यायचे थांबल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला.

थेट जीवे मारण्याची भीती
उद्योजकाने हैदराबाद येथील व्यक्तीशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही मात्र जीवे मारण्याची भीती घातल्याने ते संशयिताच्या सूचनांचे पालन करीत गेले. याच भीतीतून त्यांनी हॉटेलमध्ये स्वत:ला डांबून घेतले. आधार कार्ड, पॅन नंबर यासह इतरही महत्त्वाची माहिती संशयितांकडे असल्याने ते अधिकच घाबरले.


कॉपी करू नका.