अनियंत्रीत ट्रॅक्टरने चिरडल्याने धुळ्यानजीक तीन बालकांचा मृत्यू : सहा जण जखमी

0

Three children killed near Dhule after being crushed by an uncontrolled tractor: six injured धुळे (18 सप्टेंबर 2024) : विघ्नहर्त्या गणरायाला सर्वत्र भक्तीभावाने निरोप दिला जात असताना धुळ्यानजीकच्या चितोडमध्ये मात्र अनियंत्रीत ट्रॅक्टरने गर्दीतील तिघांचा चिरडल्याने मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. ही धक्कादायक घटना मंगळवार, 17 रोजी घडली. या अपघातामुळे गावात गोंधळ उडाला. जखमींना त्वरीत धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

नियंत्रण सुटल्याने गर्दीत शिरला ट्रॅक्टर
धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिरवणुकीत असलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीत शिरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला. काही बालकांना कळण्याच्या आत ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर गेला. या अपघातात परी बागूल (13), शेरा सोनवणे (सहा वर्षे) आणि लड्डू पावरा (तीन वर्षे) या बालकांचा मृत्यू झाला तर गायत्री पवार (25), विद्या भगवान जाधव (27), अजय रमेश सोमवंशी (23), उज्वला चंदे मालचे (23), ललिता पिंटू मोरे (16), रिया दुर्गेश सोनवणे (17) हे जखमी झाले. मृत आणि जखमी सर्व चितोड येथील रहिवासी आहेत.


कॉपी करू नका.