एक देश एक निवडणूक : लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार एकाचवेळी !

2029 पासून अंमलबजावणी ः पंचायत निवडणुका 100 दिवसानंतर होणार


One country one election : Lok Sabha and Vidhan Sabha elections will be held simultaneously! नवी दिल्ली (19 सप्टेंबर 2024) : देशात वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय मंत्री मंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. या आदेशाची 2029 पासून अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय मंत्री मंडळाने बुधवारी ‘एक देश एक निवडणूक’साठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मंजूर केल्या.

तब्बल 26 लाख ईव्हीएमची कमतरता
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 12 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 2029 मध्ये मतदान केंद्रांची संख्या 13 लाख 57 हजार होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास ईव्हीएमचे 26 लाख 55 हजार बॅलेट युनिट, 17 लाख 78 हजार कंट्रोल युनिट आणि सुमारे 17 लाख 79 लाख व्हीव्हीपॅटची कमतरता भासणार आहे. त्यामुळे या यंत्रांवर 7951 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी ईव्हीएम स्टोअरेज हेदेखील एक आव्हान आहे. ईव्हीएमसाठी कमी गोदामे असल्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वीच सांगितले आहे. खासगी इमारती आणि शैक्षणिक संस्थांमध्ये यांचे स्टोअरेज करावे लागते.

सत्ताधार्‍यांकडून डावपेच : खरगे
एक देश एक निवडणूक हे व्यावहारिक नाही. जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा खर्‍या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधार्‍यांकडून असे डावपेच खेळले जातात. असे करणे हे संविधान आणि संघराज्याच्या विरोधात आहे. भारत देश हे कधीच स्वीकारणार नाही , असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

विविधतेच्या दिशेने मोठे पाऊल : पंतप्रधान
केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणुकीच्या शिफारशी मंजूर करत लोकशाहीच्या मजबुतीकडे आणि विविधतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मी या समितीचे अध्यक्ष, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानतो, असे पीएम नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दोन टप्प्यांत एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात 100 दिवसांनंतर ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी वापरली जाणार आहे.

सर्व पक्षांशी होणार चर्चा
समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर न देता अश्विनी वैष्णव म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात सरकार त्याची अंमलबजावणी करेल, असे सांगितले आहे. एक देश एक निवडणुकीसाठी एकमत निर्माण होईल. येत्या काही महिन्यांत सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल. अंमलबजावणी समितीही स्थापन केली जाईल, असेही वैष्णव यांनी सांगितले.


कॉपी करू नका.