खंडवा विभागात रेल्वे लाईनीवर आढळले डेटोनेटर : सुरक्षा यंत्रणेकडून कसून चौकशी
भुसावळ विभागातील सागफाटा-डोंगरगाव दरम्यानची घटना
Detonator found on railway line in Khandwa section भुसावळ (23 सप्टेंबर 2024) : खंडवा सेक्शनमध्ये रेल्वे रूळावर डेटोनेटर आढळल्याची घटना बुधवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता समोर आली होती. सुरूवातीला हा प्रकार घातपात करण्यासाठी असल्याचे बोलले जात होते मात्र हे डेटोनेटर (फटाके) हे रेल्वे लोकोपायलट धोक्याची सूचना देण्यासाठी वापरत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी दिली आहे. रेल्वे रूळावर हे फटाके लावण्याचे कुठलेही कारण आढळून आले नसल्याने रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून या प्रकाराची कसून चौकशी केली जात आहे.
डेटोनेटर्स आढळल्याने खळबळ
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, 18 सप्टेंबर दुपारी 2.30 वाजता मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील साग फाटा-डोंगरगाव रेल्वे लाईनीवर डेटोनेटर्स आढळले. यावेळी सेना एक्स्प्रेस जात असताना हे डेटोनेटर फुटताच गाडी थांबवण्यात आली व सर्वत्र हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा रंगली. मध्य प्रदेशातील इंटीलीजन्स ब्युरो व एटीएस तसेच रेल्वे सुरक्षा बलाने नेमका प्रकार जाणून घेत आता चौकशीला सुरूवात केली आहे. घटनास्थळी अधिकार्यांनी जात पाहणी केली. रेल्वे मार्गावर गस्त घालणार्या दोन कर्मचार्यांना यंत्रणेने ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
‘ते’डेटोनेटर्स म्हणजे फटाके : रेल्वे चालकांकडून त्याचा वापर
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते डेटोनेटर्स म्हणजे रेल्वेकडून वापरले जाणारे एक प्रकारचे फटाके आहेत. वातावरणात धुंद वा कोहरा (फॉग) निर्माण झाल्यानंतर धोक्याची माहिती समोरून येणार्या रेल्वे गाडीच्या लोको पायलटला कळावी, यासाठी दुसर्या गाडीचा लोकोपायलट 600-600 मीटरच्या अंतरात असे चार डेटोनेटर रेल्वे रूळावर लावतो, त्यावरून गाडीचे चाक गेल्यावर ते फुटतात व जोरदार आवाज येत असल्याने संबंधित गाडीचा चालक सतर्क होतो व संभाव्य धोका टळतो. रेल्वे यंत्रणेकडून या फटाक्यांचा नियमित वापर होतो मात्र साग फाटो-डोंगरगावदरम्यान हे फटाके लावण्याचे कोणतेही औचित्य नसताना ते नेमके कुणी वा का लावले ? याची कसून चौकशी केली जात आहे.