साक्री तालुक्यात सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त
एकाला अटक : धुळे स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिसांची कारवाई
Ganja worth Rs. 1.5 crore seized in Sakri taluka धुळे (05 ऑक्टोबर 2024) : धुळे स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केल्यानंतर तस्कर हादरले आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली. पोपट ओंकार बागुल (40, रा.रायकोट, ता.साक्री ह.मु.मोहन साबळे यांचे देशशिरवाडे येथील शेतात) व मोहन देवचंद साबळे (पिंपळनेर, ता.साक्री) अशी गुन्हा दाखल असलेल्या संशयीतांची नावे असून बागुल यास अटक करण्यात आली.
संयुक्त कारवाईत गांजा जप्त
धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह पिंपळनेर पोलिसांनी साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गाव शिवारातील शेतात 4 ऑक्टोबर रोजी रात्री 11.15 वाजता धडक दिल्यानंतर एका ट्रॅक्टर ट्रॉलीत काळ्या प्लॅस्टीक कपड्याखाली एक कोटी 19 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा 542.73 किलो गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर सहा लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. एकूण एक कोटी 25 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर सहा.निरीक्षक किरण बर्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रकाश पाटोल, हवालदार संदीप पाटील, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम, कमलेश सूर्यवंशी, राजीव गीते व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे हवालदार कांतीलाल अहिरे, दीपक पाटील, भरत बागूल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी आदींच्या पथकाने केली.
