महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही ; महाविकास आघाडीच विजयी होणार ! : ठाकरे गटाचा मुखपत्रातून हल्लाबोल
मुंबई (09 ऑक्टोबर 2024) : मोदी व शहा यांनी हरियाणाच्या विजयाने हुरळून जाऊ नये. कारण जम्मू-कश्मीरात त्यांचा दारुण पराभव झाला असून पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ. हरियाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. उद्या महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही व महाविकास आघाडी विजयी होईल, असा हल्लाबोल ठाकरे गटाने मुखपत्रातून केला आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे. हरियाणात काँग्रेसने ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवले. या खेळात संपूर्ण राज्यच हातचे गेले. जम्मू-कश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाला. हरियाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र ‘इंडिया आघाडी’साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार? असा सवाल ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.





तरुणांना रोजगार देण्यात मोदी-शहा तोकडे पडले
कश्मीरातून 370 कलम हटवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार केल्याचा आव मोदी-शहा आणत होते, पण कश्मीरातील दहशतवाद त्यांना संपवता आला नाही. तरुणांना रोजगार देण्यात मोदी-शहा तोकडे पडले. मुख्य म्हणजे, हजारो कश्मिरी पंडितांची घरवापसी मोदी-शहा करू शकले नाहीत. 370 कलम काढणे हा फार्स ठरला व आता तेथील जनतेने भाजपचा पराभव केला. हरियाणात काँग्रेस व जम्मू-कश्मीरात भाजपला अशातर्हेने धक्का बसला. पंतप्रधान मोदी यांना कश्मीरच्या जनतेने झिडकारले.
काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल
ठाकरे गटाने म्हटलंय की, हरियाणातील महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगावर भाजपने व त्यांच्या पंतप्रधानांनी कोणतीच कारवाई केली नाही. विनेश फोगाट व तिच्या सहकार्यांना दिल्लीतील जंतरमंतर रोडवरून फरफटत पोलिस व्हॅनमध्ये कोंबले या सगळ्याची चीड हरियाणातील जनतेत स्पष्ट दिसत होती. अर्थात विनेश फोगाट स्वतः जिंकली तरी तिच्यावरील अन्यायामुळे हरियाणात सर्वदूर निर्माण झालेल्या संतापाचा, नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला नाही. हरियाणात भाजपविरोधी लाट होती व त्या लाटेत भाजप वाहून जाईल असे सांगितले जात होते, पण तसे घडले नाही. कारण काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल होते.
राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावे लागते. भाजपचे संघटन मजबूत होते व ‘स्ट्रटेजी’ बिनचूक ठरली. मध्य प्रदेशात कमलनाथांनी भाजपला सरळ मदत केली. हरियाणात हुड्डा यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा होता, तरीही हुड्डा हे काँग्रेसबरोबरच राहिले. हरियाणातील जाट समुदायाचे ते मोठे नेते, पण इतर समाजाला ते काँग्रेसबरोबर उभे करू शकले नाहीत. जाट विरुद्ध इतर समाज असा हा सामना झाला व त्यात भाजपने बाजी मारली. पुन्हा हरियाणातील भाजप विजयात बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल’वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही ‘वाटा’ आहेच. हा बाबा नेमका निवडणुकीच्या काही दिवस आधी ‘पॅरोल’वर कसा सुटतो? याआधीच्या निवडणुकांतही बाबा राम रहीमचे हे‘निवडणूक कनेक्शन’ दिसून आले हेते. निकालाच्या एक दिवसापूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले होते की, भाजपच जिंकेल.
महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच विजयी होणार
ठाकरे गटाने म्हटलंय की, आम्हीच जिंकू याचा सर्व बंदोबस्त केला आहे. सैनी यांचे हे विधान रहस्यमय आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसने ठिकठिकाणी जिलेब्या-लाडू वाटायला सुरुवात केली; पण पुढच्या तासाभरात भाजपने आघाडी घेतली व काँग्रेस पिछाडीवर गेली. निवडणूक आयोगानेही नंतर मतमोजणीची गती मंद केली. हे का घडले? काँग्रेसची सर्वत्र आघाडी दिसत असताना मतमोजणी आणि त्याविषयीचे ‘अपडेटस’ यांची गती अचानक कमी का झाली? काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यावरून निवडणूक आयोगावर आरोपही केले आहेत. हरियाणातील भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद ठरला आहे. तेव्हा मोदी व शहा यांनी हरियाणाच्या विजयाने हुरळून जाऊ नये. कारण महत्त्वाचे राज्य असलेल्या जम्मू-कश्मीरात त्यांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ. उद्या महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही व महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयी होईल. याबाबत वृत्त दिव्य मराठी ऑनलाईन पोर्टलने दिले आहे.
