यावल तालुक्यातील 36 हजार 840 लाभार्थींना मिळणार आनंदाचा शिधा
यावल (12 ऑक्टोंबर 2024) : यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून आगामी विजयादशमीच्या निमित्ताने शासनाकडून प्राप्त झालेला आनंदाचा शिधा वितरणासाठी रवाना झाला आहे. तहसीलदार तसेच पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत यावल तालुक्यातील सर्व 124 धान्य दुकानांकरीता 36 हजार 840 लाभार्थींसाठी हा आनंदाचा शिधा बुधवारी वितरणासाठी रवाना करण्यात आला आहे. आता लवकरच हा आनंदाचा शिधा सर्व लाभार्थींना वितरीत केला जाणार आहे.
124 दुकानदारांना शिधा वितरण
यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब तसेच अन्नसुरक्षा अंतर्गत निवड झालेल्या कुटुंबांसाठी येत्या विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेला हा आनंदाचा शिधा आता यावल शहरातील सातोद रस्त्यावरील पुरवठा विभागाच्या गोदामातून विविध वाहनांच्या माध्यमातून बुधवारी तालुक्यातील 124 दुकानदारांकडे वितरणाची कारवाई सुरू करण्यात आली. विविध दुकानात पात्र लाभार्थ्यांसाठी हा आनंदाचा शिधा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे, गोदामपाल वाय.डी.पाटील, सुकलाल कोळी, ललित भारंबे यांच्या माध्यमातून वाहनाद्वारे रवाना करण्यात आला आहे. विजयादशमी पूर्वीच लगबगीने हा आनंदाचा शिधा प्रत्येक लाभार्थ्याला वितरण करण्याच्या सूचना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी यावल तालुक्यातील सर्व दुकानदारांना केल्या.
आनंदाच्या शिधेत चार वस्तूंचा समावेश.
यंदाच्या आनंदाचा शिध्यात चणाडाळ, साखर, तेल आणि रवा याचा समावेश आहे. लाभार्थीनिहाय हा आनंदाचा शिधा तातडीने वितरण केला जाणार आहे. यावल तालुक्यात एकूण 124 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत. यात प्राधान्य कुटुंब तसेच अन्नसुरक्षा अंतर्गत एकूण 36 हजार 840 लाभार्थी आहेत. या लाभार्थी कुटुंबांना हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वितरण केला जाणार आहे.