ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक : 15 उमेदवारांचे तिकीट निश्चित !


मुंबई (17 ऑक्टोबर 2024) : माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर विद्यमान आमदारांची बैठक झाली व या बैठकीत 15 उमेदवारांचे तिकीट निश्चित झाल्याची माहिती आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील उद्धव ठाकरे यांनी दिले असून 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. आजची झालेली बैठक ही महत्त्वाची मानली जात असून याकडे शिवसेना ठाकरे गटातील सर्वच नेत्यांचे लक्ष लागले होते.

15 आमदारांना मिळाले ए.बी.फार्म
शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यातील बहुतांश आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जात आहे. ज्या आमदारांना मुहूर्तावर एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचे आहे, ते आमदार त्यादिवशी एबी फॉर्म घेऊन जातील, असेही समजते.

महाविकास आघाडीचा तिढा कायम
दरम्यान, महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी बैठक पार पडली होती. बैठकीनंतरही 20 ते 22 जागांवर तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. नागपूर दक्षिण, श्रीगोंदा, शिर्डी, औसा, मिरज, हिंगोली या जिल्ह्यातील जागांवर तिढा कायम असून तीनही पक्षांनी येथील जागांवर दावा केला आहे. याबाबत नाना पटोले यांनी देखील माहिती दिली आहे. मात्र हा तिढा लवकरच सुटेल, असे आश्वासन देखील नाना पटोले यांनी दिले आहे.


कॉपी करू नका.