ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांविरोधात गुन्हा : शायना एन.सी.विरोधात अपशब्द भोवला


मुंबई (1 नोव्हेंबर 2024) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांच्याबद्दल बोलताना इम्पोर्टेड माल अशी टिप्पणी केल्यानंतर शायना एन.सी.यांनी नागपाडा पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नागपाडा पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत शायना एन.सी.यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल खासदार सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

तक्रार दाखल होताच मविआवर टीका
अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबा देवीतील महिला त्यांना त्यांची जागा दाखवतील असेही शायना म्हणाल्या. एफआयआरची कॉपी दाखवत शायना म्हणाल्या की, ही एफआयआरची कॉपी आहे. ही महाविनाश आघाडी महिलांचा सन्मान करत नाही. देशभरात आज लक्ष्मीपूजन आहे. शुभ मुहूर्त आहे. पण अरविंद सावंत काय म्हणतात? तुम्ही इम्पोर्टेड माल आहात.

माल म्हणजे आयटम. मला सार्वजनिक जीवनात आतापर्यंत 20 वर्षे झाले. तुम्ही सर्व जाणता की, मी किती निष्ठेने काम केले आहे. मुंबादेवीचे आशीर्वाद आहेत. मी महिला आहे पण माल नाही. आमच्यासारखी प्रोफेशनल महिला, सक्षम महिला किंवा कोणतीही महिला, त्यांच्याप्रती तुम्ही अभद्र टीका करणार असाल, तर ही एफआयर आणि कायदा आपले काम करेल. जेव्हा एखाद्या महिलेबद्दल तुम्ही अभद्र वक्तव्य करतात, तेव्हा तुम्ही तिचा अवमान करतात. तुम्हाला वाटते प्रत्येक महिला शांत राहणार. पण ही महाराष्ट्राची महिला उत्तर देणार, असे प्रत्युत्तर शायना एन. सी. यांनी अरविंद सावंत यांना दिले.


कॉपी करू नका.