मनोज जरांगे आज करणार उमेदवारांची निश्चिती : महायुतीसमोर आव्हान?


जालना (3 नोव्हेंबर 2024) : महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी महायुतीविरोधात षड्डू ठोकले असून आज रविवारी त्यांनी उमेदवारांची घोषणा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. राज्यातील महायुतीला मोठे आव्हान निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे उमेदवारांना मनोज जरांगे यांनी बोलावले असून ते उमेदवारांशी संवाद साधणार आहेत तसेच आजच उमेदवारांची घोषणा देखील ते करणार आहेत.

मराठा बांधवांमध्ये प्रचंड उत्साह
उमेदवार जाहीर करण्याबाबत मनोज जरांगे म्हणाले, ज्या मतदारसंघात ज्याला वाटते की आपण निवडणूक लढवली पाहिजे, अशा लोकांनी अर्ज भरा. ऐनवेळी आपण ठरवू की उमेदवार कोण असेल. ज्याला मी सांगेन त्याने अर्ज मागे घ्यायचा. पण जर मी सांगूनही एखाद्याने अर्ज मागे घेतला नाही तर तो आपला नाही. त्याला मदत करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार मराठा बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता त्यापैकी कोण अधिकृत उमेदवार असेल आणि कुणी अर्ज मागे घ्यायचा यावर आज निर्णय होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-मुस्लिम-मागासवर्गीय असे समीकरण तयार करत या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे. या निमित्त अंतरवाली सराटी येथे मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी देखील काही दिवसांपूर्वी येऊन गेले आहेत. यावेळी आनंदराज आंबेडकर देखील उपस्थित होते.


कॉपी करू नका.