मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका : विधानसभा निवडणुकीतून माघार !


जालना (04 नोव्हेंबर 2024) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांनी आता मोठा निर्णय घेता निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

एकाच जातीवर निवडणूक लढणे अशक्य
जरांगे यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मित्र पक्षाची यादी आलेली नाही त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही त्यामुळे समाजबांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी केले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांची बैठक घेतली.
मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्रिसूत्री घेत या बैठकीत 25 मतदार संघावर चर्चा करण्यात आली. रात्री 14 मतदार संघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करायचे होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित मित्रपक्षातील उमदेवार देण्यावर चर्चा करण्यात आली. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची, एका जातीवर निवडणूक लढायची का यावर चर्चा करण्यात आली. परंतु, मित्रपक्षाची यादी सकाळी 9 वाजले तरी आलीच नाही.

जरांगे म्हणाले की, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणी आमच्या कामाचे नाही त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदारसंघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून ‘मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे’, असे लिहून घ्या, असे आवाहन केले. आम्ही निवडणुकीत असलो तरी समोरच्याचा खेळ खलास आणि नसलो तरी खेळ खलास, असे म्हणत विरोधकांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला. तसेच आता गणिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू, असेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.