महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा
मुंबई (5 नोव्हेंबर 2024) : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका दिवसांपूर्वीच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर या जागी कुणाची नियुक्ती होते? याकडे लक्ष लागून असतानाच आयपीएस संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
आरोपांमुळे रश्मी शुक्ला यांना हटवले
काही दिवसापासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी आरोप केले होते. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली होती. सोमवारी निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते. बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.





