नव्या पिढीला पुढे आणलं पाहिजे म्हणत शरद पवारांनी दिले ‘हे’ संकेत
बारामती (5 नोव्हेंबर 2024) : मी सत्तेत नाही, राज्य सभेमध्ये आहे. माझा दीड वर्षाचा कार्यकाळ अद्याप शिल्लक आहे. या दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही, याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कसलीच निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका लढायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका लढल्यात. तुम्ही असे लोक आहात की मला एकदाही कधी घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला पुढे आणलं पाहिजे, असे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ राजकीय वर्तुळात विविध प्रकारे काढले जात आहेत.
राजकीय निवृत्तीचे संकेत
शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत 14 निवडणुका लढल्यात. तुम्ही मला दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला पुढे आणलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेमध्ये उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. याचा अर्थ समाजकारण सोडणार नाही. सत्ता नको मात्र लोकांची सेवा लोकांचं काम करत राहीन, असे शरद पवार म्हणाले.
नवीन पिढी पुढे यायला हवी
तत्पूर्वी शरद पवार म्हणाले की, मी तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर विधानसभेत गेलो. राज्यमंत्री झालो. मंत्री झालो. चार वेळा मुख्यमंत्री झालो. केंद्रात संरक्षण, शेती खात्यात काम केलं. आज मी राज्यसभेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मी लोकसभेत तुमच्या मतांवर निवडून गेलो. पहिल्यांदा ठरवलं की, आता लोकसभा लढवायची नाही. 30-35 वर्षे सतत निवडून गेल्यानंतर नवीन पिढी तयार केली पाहिजे.
काही वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की, मी लोकसभेवर जाणार नाही. इथलं राजकारण मी पाहणार नाही. त्यानंतर ही जबाबदारी मी अजित पवार यांच्यावर सोपवली. तेव्हापासून 20-25 वर्षे ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पहिली 30 वर्षे माझ्यावर. माझ्यानंतर 30 वर्षे अजित पवार आणि आता पुढच्या 30 वर्षांची तयारी करण्याची आवश्यकता आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची दृष्टी पाहिजे, असे त्यांनी सांगितले.