मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार : दोन आरोपींना अटक


बोदवड (5 नोव्हेंबर 2024) : बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर राजूर गावात मंगळवारी दुपारी प्रचार दौर्‍यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या त्रिकूटाने गोळीबार केला होता. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली.
दीपक दादाराव शेजोले (येवती, ता.बोदवड) व आयुष उर्फ चिकू गणेश पालवे (19, नांदगाव, ता.बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

प्रचार दौर्‍यादरम्यान गोळीबार
मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी विनोद सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली. 30 वाहनांच्या ताफ्यासह शिरसाड, चिंचखेडा, कोल्हाडी येथे प्रचार आटोपल्यानंतर बोदवडला प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले व तेथून वाहनांच्या ताफ्यासह सोनवणे हे राजूरा येथे दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पोहोचले मात्र त्याचवेळी ताफ्यात अग्रभागी असलेल्या त्यांच्या वाहनावर (एम.एच.19 सी.एफ.1191) च्या दिशेने तीन हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्याची माहिती सोनवणे यांनी बोदवड येथे माध्यमांना दिली होती. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर विनोद सोनवणे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

दैव बलवत्तर म्हणून बचावलो : विनोद सोनवणे
गोळीबाराच्या घटनेनंतर विनोद सोनवणे हे बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. त्यांच्याकडून यंत्रणेने घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. माध्यमांशी बोलताना विनोद सोनवणे यांनी दैव बलवत्तर म्हणून बचावलो असल्याचे सांगितले. दोन दुचाकीवरून तीन संशयीतांनी दोन गोळ्या झाडल्या मात्र त्या गाडीवरून गेल्या. या प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी संशयीताचा पाठलाग केला मात्र ते पसार झाले.


कॉपी करू नका.