आम्ही बटणारही नाही आणि कटणार नाही ! उद्धव ठाकरे कडाडले
यवतमाळ (11 नोव्हेंबर 2024) : आम्ही बटणारही नाही आणि कटणार नाही. भाजपचे धोरण महाराष्ट्राची लूट करून मित्रांना देण्याचे आहे. पण आम्ही तुम्हाला ही लूट करू देणार नाही. भाजपचे खरे धोरण हे बाटेंगे व लुटेंगे हे आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्राने मोदी, शहा व अदानींकडे भीक मागावी असा त्यांचा मानस आहे. त्यानंतर ते आम्ही हे केले ते केले हे म्हणणार. पण त्यांनी काहीच केले नाही हेच सत्य असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सोमवारी यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात त्यांची प्रचारसभा झाली. यावेळी ते बोलत होते.
बॅगा तपासण्यावरून प्रशासन धारेवर
ठाकरे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. मोदी-शहांनी अवघा महाराष्ट्र विक्रीस काढला आहे. मोदींची नासकी, फुसकी व खोटी गॅरंटी आज महाराष्ट्रात चालत नाही. येथे केवळ बाळासाहेबांचे खणखणीत नाणे चालते त्यामुळेच त्यांच्यावर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून प्रचार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याच्या मुद्यावरून प्रशासनालाही चांगलेच धारेवर धरले.
अधिकार्यांनी तपासल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगा
ते पुढे म्हणाले, मी येथे प्रचाराला आल्यानंतर 7-8 अधिकार्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना त्याची परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकार्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाकानाक्यावर अडवतील तिथे – तिथे तपास अधिकार्यांचे खिसे तपासा.
माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकार्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी – शहांचीही बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटवाल्यासह फडणवीस यांचीही बॅग तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.