गुटखा तस्कर शिरपूर तालुका पोलिसांच्या रडारवर : 26 लाखांच्या गुटख्यासह परभणीतील चालकाला बेड्या
निवडणुकीच्या धामधूमीत सततच्या कारवायांमुळे गुटखा तस्कर हादरले : पुरवठादारावरही कारवाईची अपेक्षा
Gutkha smuggler on Shirpur taluka police’s radar : Parbhani driver arrested with gutkha worth 26 lakhs शिरपूर (17 नोव्हेंबर 2024) : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुटख्याचा आयशर ट्रक पकडत 26 लाखांचा गुटखा जप्त केला. परभणीतील चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर रविवार, 17 रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आली. तानाजी बाळासाहेब पोळे (28, दामपूरी, ता.जि.परभणी, ह.मु.घुगे चाळ, शुभम किराणाजवळ, मोरवाडी, अंबड, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुटख्याची आयशर वाहनातून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. रविवारी सकाळी आठ वाजता संयशीत आयशर ट्रक (एम.एच.15 एफ.व्ही.9277) आल्यानंतर तपासणी केली असता त्यात सात लाख 92 हजार रुपये किंमतीचा सम्राट पानमसाला , 17 लाख 78 हजार 400 रुपये किंमतीचा राफेल प्रिमियम पानमसाला आढळल्याने तो जप्त करण्यात आला तसेच 15 लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक मिळून एकूण 40 लाख 70 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, जयेश मोरे, सुनील पवार, मनोज नेरकर, चालक अल्ताफ मिर्झा, इसरार फारूकी, कॉन्स्टेबल सागर कासार आदींच्या पथकाने केली.