मुक्ताईनगर विधानसभा : 322 केंद्रावर कर्मचारी निवडणूक साहित्यासह रवाना
मुक्ताईनगर (19 नोव्हेंबर 2024) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, 20 रोजी निवडणूक होत असून त्यासाठी नियुक्त कर्मचार्यांना मंगळवारी मुक्ताईनगर शहरातील एस.एम.कॉलेज, क्रीडा संकुलातून निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. 322 मतदान केंद्रावर कर्मचारी वाहनांद्वारे रवाना झाले. निवडणूक निरीक्षक स्मिताक्षी बरूवा यावेळी उपस्थित होत्या.
सकाळी आठ वाजेपासून साहित्य वाटप
साहित्य वाटप करण्यासाठी एकूण 22 टेबल लावण्यात आले. मंगळवारी सकाळी आठ वाजता सूक्ष्म निरीक्षक व वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी डीजीएम ए.के.सिंग यांच्या उपस्थितीत एस.एम.कॉलेजची स्ट्राँग रूम उघडण्यात आली. पोलिंग टीम मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजेपासून नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना झाल्या.

पोलिंग पार्टी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर सुस्थितीत पोहोचल्या आहे की नाही याकरीता 31 क्षेत्रीय अधिकार्यांमार्फत तपासणी करण्यात आली. एस.एम.कॉलेज, मुक्ताईनगर येथे टपाली मतदानाकरिता टपाली मतदान केंद्र स्थापीत करण्यात आले. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन महिला संचलित मतदान केंद्र, पाच आदर्श मतदान केंद्र, एक युवा मतदान केंद्र, दोन दिव्यांग मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.




