प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे भाजपाची बी टीम : ठाकरे गटाचा घणाघात
सोलापूर (20 नोव्हेंबर 2024) : सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीने अमर पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर येथे मात्र खासदार प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाकडून सुपारी घेऊन अपक्षाला पाठिंबा दिल्याचा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी
सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे. शिंदे कुटुंबाच्या भूमिकेनंतर ठाकरे गट संतापला आहे. याबाबत शरद कोळी म्हणाले की, प्रणिती शिंदे भाजपाची बी टीम आहे. भाजपाचा प्रचार करते. आतून त्यांची हातमिळवणी झाली आहे. तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल. यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर कुठेही खासदार म्हणून निवडून येणार नाही याचा बंदोबस्त शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही. शिवसैनिकांचा केसाने गळा कापण्याचं काम तुम्ही केलंय असा आरोप त्यांनी केला.
पाठीत खंजीर खुपसला
सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही, प्रणिती शिंदे यांनीही केला नाही. प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर स्वप्नातही खासदारकी बघता आली नसती. डिपॉझिट जप्त झाले असते. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केलेल्या कामामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली, तुम्ही आभार मानायचे सोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले. यापुढची खासदारकी तुम्ही स्वप्नात बघायची. तुम्ही खासदार होणार नाही याची दक्षता शिवसैनिक घेणार असंही शरद कोळी यांनी म्हटलं आहे.