सरकार स्थापन होताच सामूहिक आमरण उपोषण : मनोज जरांगे यांचा इशारा


जालना (21 नोव्हेंबर 2024) : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन करीत निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर सरकार स्थापण्याच्या आठ दिवसानंतर सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. समाजाला त्या दृष्टीने त्यांनी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

येथून पुढील जबाबदारी मराठ्यांची
मनोज जरांगे गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात पत्रकाराने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज व्यक्त करण्याची विनंती केली. त्यावर ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या मैदानात नाही. माझा समाजही नाही. त्यामुळे मी कसा अंदाज सांगू शकतो? आम्ही मैदानात असतो तर हा अंदाज सांगता आला असता. शेवटी या राज्यात मराठा समाजाच्या मतांशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे आता येथून पुढची जबाबदारी मराठ्यांची आहे.


आता केवळ आरक्षणाची आरपारची लढाई
आता आमच्यासाठी निवडणूक व प्रचाराचा मुद्दा संपला आहे. आता त्याला पुन्हा पुन्हा गिरवण्यात मजा नाही. मराठ्यांनी आता आपल्या डोक्यातून राजकारणाचा विषय काढून टाकला आहे. पुढे होईल ते होईल. पण आता आमच्या डोक्यात आमच्या आयुष्याचा, भविष्याचा व लेकराबाळांचा विषय आहे. मतदान संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आमच्या आरक्षणाची लढाई सुरू झाली आहे.

सरकार स्थापन होताच जाहीर करणार तारीख
मराठा समाज आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्याची तयारी करायची आहे. सर्वांनी आपापल्या शेतातील कामे उरकून इकडे आंतरवाली सराटीत यावे. सरकार स्थापन झाले की या उपोषणाची तारीख घोषित केली जाईल, असे मनोज जरांगे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत सत्ता कुणाचीही आली तरी आरक्षणासाठी मला लढा द्यावाच लागेल. नवे मंत्री झालेल्यांना 8 दिवस आनंद घेऊ देणार. त्यानंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार. आंतरवाली सराटीमध्ये जिकडे जागा मिळेल तिकडे उपोषण करण्यात येईल. जागा नसेल तर प्रसंगी आंदोलक रस्त्यावर बसतील.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !