भुसावळात विजयाच्या चौकारानंतर आमदार संजय सावकारे कार्यकर्त्यांसोबत थिरकले

भुसावळला लाल दिवा मिळण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा निकालानंतर कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष


भुसावळ (24 नोव्हेंबर 2024)  भुसावळ विधानसभेसाठी 20 रोजी निवडणूक पार पडल्यानंतर शनिवार, 23 रोजी सकाळी आठ वाजता भुसावळ तहसील कार्यालयामागील गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. भुसावळच्या रिंगणात आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा असलेतरी त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजपेयींकडून निवडणुकीनंतर केला जात होता व तो निकालाअंती खरादेखील ठरला आहे. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडल्यानंतर डॉ.राजेश मानवतकर यांना ऐनवेळी उमेदवारी दिली मात्र त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. दरम्यान, निकालाची उद्घोषणा होत असताना भाजपा कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांचा गजर करीत नृत्य करण्यात येत होते. आमदारांच्या विजयाची घोषणा होता भाजपा कार्यकर्त्यांनी डीजे तालावर जोरदार नृत्य करीत जल्लोष केला तर मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण केली. कार्यकर्त्यांच्या गराड्यात यावेळी आमदारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी जल्लोष केला.

उत्कंठा अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
भुसावळातील जळगाव रस्त्यावर सकाळी आठ वाजेपासून भाजपा पदाधिकारी मतमोजणी केंद्राबाहेर थांबून होते. लाऊड स्पीकरवर फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर व आमदारांचा पहिल्या फेरीपासून वाढत जाणार्‍या लीडनंतर कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांचा गजर केला जात होता तर पदाधिकारीदेखील बेभान होवून थिरकत होते. सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत ढोल-ताशांचा गजर करून पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला.


डीजेच्या तालावर आमदार थिरकले
भुसावळ विधानसभेत सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार मारून आपले वर्चस्व सिद्ध करणार्‍या आमदार संजय सावकारे यांचा पदाधिकार्‍यांनी निकालाची अंतीम घोषणा होताच जयघोष केला. मतमोजणी केंद्रातून आमदार संजय सावकारे व त्यांचे मोठे बंधू प्रमोद सावकारे बाहेर पडताच पदाधिकार्‍यांनी त्यांनी खांद्यावर घेत नृत्य केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करण्यात आली. कार्यकर्त्यांसोबत सावकारे बंधूही थिरकले. यावेळी महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या तर आमदार सावकारे यांचाही जयघोष करीत आता भुसावळला हवा लाल दिवा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

विजयी मिरवणुकीने वेधले लक्ष
बोलण्या-वागण्यात कुठलाही बडेजावपणा नसलेल्या आमदारांनी विजयी मिरवणुकीत पायीच सहभाग नोंदवला. भुसावळ तहसील कार्यालय तर जामनेर रोडवरील निवासस्थानापर्यंत आमदारांची विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदारांनी शहरवासीयांना विनम्रपणे हात जोडून अभिवादन करीत त्यांचे आभारही मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !