भुसावळात आमदार संजय सावकारेंवर जेसीबीद्वारे फुलांची उधळण
आमदार संजय सावकारे म्हणाले : विजय अपेक्षितच, भुसावळकर मतदारांचे मनपूर्वक आभार
भुसावळ (24 नोव्हेंबर 2024) : लेवा समाजासह दलित व मुस्लीम व सामाजिक समीकरणांना फेल ठरवत भुसावळ विधानसभेत आमदार संजय सावकारे यांनी सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार मारत भुसावळातील विरोधकांना गपगार केले आहे. सलग चौथ्यांदा विजय मिळवणार आमदार सावकारे हे पहिलेच भाग्यशाली आमदार ठरले आहेत. भुसावळात झालेल्या महायुतीच्या विजयानंतर आता भाजपेयींना भुसावळ पालिकेवर निश्चितपणे भाजपाचा भगवा झेंडा फडकेल, अशी आशा आहे. 2019 च्या निवडणुकीपेक्षा पाच हजार 526 मतांनी आमदारांचा लीड कमी झाला असलातरी आमदारांची शहर व ग्रामीण भागात असलेली मजबूत पकड यातून सिद्ध झाली आहे.
सामाजिक समीकरणे ठरवली फेल
भुसावळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने डॉ.राजेश मानवतकर यांना उमेदवारी दिली तर अपक्ष स्वाती जंगले रिंगणात होत्या. बुद्धीस्ट व लेवा समाजाच्या उमेदवारांनी आमदारांपुढे मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र सुरूवातीला समोर आले मात्र कुठल्याही नेत्यांची एकही सभा न होवू देता आमदारांनी केवळ विकासकामांच्या जोरावर मते मागितली व कुणावरही टीका न करता केवळ विकासाचे व्हिजन जनतेपुढे नेत मतांचा आशीर्वाद मागितला व जनतेनेही आपल्या हक्काचा आमदार म्हणून कौल देत यंदाच्या निवडणुकीत विजयी करून सलग चौथ्यांदा त्यांना विधानसभेत पाठवले.


अशी मिळाली मते
भुसावळ भाजपाचे आमदार संजय सावकारे यांना एक लाख सात हजार 259, काँग्रेसचे राजेश मानवतकर यांना 59 हजार 771, अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांना नऊ हजार 764, वंचितचे जगन देवराम सोनवणे यांना तीरन हजार 720, बसपाचे राहुल बनसोडे यांना 537, अपक्ष अजय इंगळे यांना 504, अपक्ष गौरव बाविस्कर यांना 160, अपक्ष प्रतिभा जगदाळे यांना 645, अपक्ष सुशील मोरे यांना 391 मते मिळाली. 54 मते बाद ठरली तर एक हजार 538 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.
प्रमुख उमेदवारांची मतमोजणी केंद्रात हजेरी
शनिवारी सकाळी आठ वाजता तहसील कार्यालयाच्या गोदामात 13 टेबलावर मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला पोस्टल मत बाजूला करण्यात आली असलीतरी त्यांची मोजणी सर्वात शेवटी करण्यात आली. काँग्रेस उमेदवार डॉ.राजेश मानवतकर हे सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी केंद्रात हजर होते तर आमदार संजय सावकारे यांनी दुपारी 11.45 वाजता मतमोजणी केंद्राला भेट देत मतांचा आढावा घेतला.
यांचे निकालासाठी परिश्रम
निवडणूक अधिकारी व प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी निता लबडे, नायब तहसीलदार अंगद आसटकर, गटविकास अधिकारी सचिन पानझडे व अधिकारी, कर्मचार्यांनी निकालासाठी परिश्रम घेतले. भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांनी बंदोबस्ताचे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले.

रिंगणातील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
आमदार संजय सावकारे (भाजपा, विजयी) 107259
डॉ.राजेश मानवतकर (काँग्रेस) 59771
स्वाती जंगले (अपक्ष) 9764
जगन सोनवणे (वंचित) 3720
राहुल बनसोडे (बसपा) 534
अजय इंगळे (अपक्ष) 504
गौरव बाविस्कर (अपक्ष) 160
प्रतिभा जगदाळे (अपक्ष) 645
सुशील मोरे (अपक्ष) 391
विजय अपेक्षितच होता, भुसावळकर मतदारांचे मनपूर्वक आभार : आमदार संजय सावकारे
पभुसावळ विधानसभेच्या निवडणुकीत आपण निश्चितपणे 50 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होवू हा विश्वास होता व तो खरा ठरला. मतदारांचा कौलही या निवडणुकीत दिसून आला. अपेक्षेप्रमाणे निकाल लागला असून लाडक्या बहिणींनीदेखील मोलाची साथ दिली शिवाय कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी विजयासाठी परिश्रम घेतल्याने त्यांचे निश्चितपणे आभार मानतो. विरोधकांनी सभा घेवून आपल्यावर टीका-टीपणी केली मात्र वरिष्ठांनी भुसावळात कुठल्याही सभेची आवश्यकता नसल्याचे सांगितले. भुसावळकरांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास निश्चितपणे आपण सार्थ ठरवू व प्रलंबित विकासकामे निश्चितपणे मार्गी लावू, असेही आमदार म्हणाले.
सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवावे : डॉ.मानवतकर
पमहाविकास आघाडीतील तीन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव, उशीराने जाहीर झालेल्या तिकीटामुळे आमचे व्हीजन जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे आमचा पराभव झाला, असे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर यांनी सांगितले. आमदार संजय सावकारे यांना विजयाच्या शुभेच्छा मात्र त्यांनी आता सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत शिवाय शहराचा रखडलेल्या विकासाला चालना द्यावी. आमचा राजकीय लढा व सामाजिक कामे सुरूच राहतील, असे डॉ.मानवतकर म्हणाले.




