रावेरातील ऐतिहासीक विजयानंतर आमदार अमोल जावळे यांच्यावर फुलांची उधळण

घराणेशाहीला मतदारांनी नाकारले ः सामाजिक समीकरणांना निष्प्रभ ठरवत मिळवला ऐतिहासीक विजय


रावेर (24 नोव्हेंबर 2024) : रावेर मतदारसंघात दर पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार बदलण्याचा ट्रेंड असल्याने तो पायंडा यंदाच्या निवडणुकीतही मतदारांनी कायम राखला. रावेर मतदारसंघाची काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलीतरी महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी सर्व सामाजिक समीकरणांना फेल ठरवत तब्बल 43 हजार 562 मतांनी ऐतिहासीक विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांचा येथे पराभव झाला.

पाच फेरीनंतर जावळेंची आघाडी
सुरुवातीला पहिल्या फेरीत काँग्रसेचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी आघाडी घेतली मात्र पाचव्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लीड 24 व्या फेरीपर्यंत कायम राखला. अमोल जावळे यांना एक लाख 13 हजार 676 तर प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांना 70 हजार 114 मते मिळाली तर 43 हजार 562 मताधिक्याने जावळे विजयी झाले व हा विजय ऐतिहासीक मानला जात आहे.


सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात
रावेरातील प्रशासकीय इमारतीत शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. रावेर विधानसभेचे निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी प्रक्रिया राबवली. त्यावेळी रावेर तहसीलदार बी.ए.कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे, रावेर पालिका मुख्याधिकारी समीर शेख, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, किशोर पवार, आर.डी.पाटील, राजेंद्र फेगडे उपस्थित होते.रावेर मतदारसंघात पोस्टल मतदानासहित दोन लाख 30 हजार 801 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

रावेरात फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
मतमोजणी केंद्राबाहेर फेरीनिहाय जसे-जसे मताधिक्य वाढत होते तस-तसा कार्यकर्त्यामध्ये उत्साह येत होता. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण व पेढे वाटप करून कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पीएसआय घनश्याम तांबे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला.

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद
पसुरवातीला काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांनी चौथ्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती मात्र पाचव्या फेरीपासून अमोल जावळे यांनी लीड कायम राखला.रावेर मतदारसंघात पंचवार्षिक निवडणुकीत सलग एका पक्षाला निवडून देण्याची परंपरा नसल्याने यावेळी देखील नवीन उमेदवाराला मतदारांनी संधी दिली. या निवडणुकीत विकासाचा अजेंडा, जातीय समीकरणे, धार्मिक धृ्रवीकरण, लाडकी बहिण योजना प्रभावी ठरल्याने भाजपने इतिहास रचत यश मिळवले आहे.

रोजगार निर्मितीसाठी काम करणार नूतन आमदार अमोल जावळे
रावेर व यावल तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. मतदारसंघात प्रलंबित असलेल्या कामांना चालना देण्यात येईल. मेगा रिचार्ज प्रकल्प, रस्ते, बनाना हब तसेच रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात येईल. सामाजिक शांतता आणि विकास यावर फोकस असेल, असे नवनिर्वाचित आमदार अमोल हरीभाऊ जावळे म्हणाले.

रिंगणातील उमेदवारांना अशी मिळाली मते
पअमोल हरिभाऊ जावळे (भाजपा, विजयी) 113676
धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस) 70114
दारा मोहम्मद जाफर मोहम्मद (अपक्ष) 9814
शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी) 8453
नारायण हिरामण अडकमोल (बसपा) 764
अनिल छबीलदास चौधरी (प्रहार) 25170
आरीफ खालीक शेख (ऑल इंडिया मजलीस ए इन्क्लाब) 349
खालूबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदूस्थान काँगे्रस पार्टी) 285
मुस्ताक कमल मुल्ला (काशीराम) 498

यांची होती उपस्थिती
पअरविंद देशमुख, सुरेश धनके, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, सुनील पाटील, सी.एस.पाटील, कृउबा सभापती सचिन पाटील, हिराभाऊ चौधरी, विलास चौधरी, भरत महाजन, अमोल पाटील, जितू पाटील, संदीप सावळे, महेश चौधरी, राजन लासूरकर, हरलाल कोळी, भास्कर महाजन, अरुण शिंदे, दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.
प24 व्या शेवटच्या फेरीनंतर अमोल जावळे यांना निवडणूक अधिकारी बबनराव काकडे यांनी निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !