भाजपाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागणार ?
मुंबई (26 नोव्हेंबर 2024) : राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या वर्चस्वानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी ? यावर दोन दिवसांपासून खल सुरू आहे. भाजपाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट असल्याने मुख्यमंत्रीपदी आधी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र चर्चेच्या वाटाघाटीत नेमके काय निष्पन्न होते हे लवकरच कळणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी 15 व्या विधानसभेची अधिसूचना काढल्यामुळे आता सरकार स्थापन करण्यास उशीर झाला तरी राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा धोका नाही.
आरएसएस फडणवीस यांच्यासाठी अनुकूल
भाजपचे सर्वाधिक 132 आमदार आहेत. त्यांचा स्ट्राइक रेटही सर्वाधिक आहे. भाजपसह त्यांना पाठिंबा देणारे 5 अपक्ष, राष्ट्रवादीचे 41 अशा 178 आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत, अशी आग्रही मागणी केली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप कोअर कमिटीही त्यांच्या नावाला अनुकूल आहे. भाजप हायकमांडपर्यंत या भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. परंतु ‘आपल्या नेतृत्वात महायुतीला भक्कम यश मिळाल्याने पुन्हा एकदा अडीच वर्षे आपल्याच हाती राज्याचे नेतृत्व द्यावे,’ असा शिंदेंचा आग्रह आहे.

सोमवारी फडणवीस व शिंदे यांच्या बंगल्यावर आमदारांच्या बैठका सुरू होत्या. शिंदेंनीही काही अपक्षांना गळाला लावून संख्याबळ वाढवले आहे. दरम्यान, दुपारी शंभूराज देसाई, दादा भुसे व नीलम गोर्हे या शिंदेसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंचा ‘निरोप’ फडणवीसांपर्यंत पोहोचवला. यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले.
अशा आहेत शक्यता
निष्ठेचे फळ म्हणून आता फडणवीस यांना सीम करावे, शिंदेंनी आता ‘त्याग’ करावा
पहिली अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री होतील.
सुरुवातीला मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असे 8 ते 10 मंत्रीच शपथ घेतील. डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्रिपदावरून ‘डिमोशन’ मान्य नसेल तर एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची भाजपची तयारी. त्यांचे पुत्र श्रीकांत यांना राज्यात आणून किंवा अन्य एका ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. दिल्लीतील ल्युटियन्स भागात नुकताच एका मराठी नेत्यासाठी बंगला राखीव करण्यात आल्याचा संबंधही शिंदे यांच्याशी जोडला जात आहे.




