भुसावळात लाडक्या बहिणींची साथ ; हिंदूत्वाचा मुद्दा ठरला प्रभावी
विधानसभा निवडणूक विश्लेषण : सलग विजयाचा चौकार मारणारे संजय सावकारे ठरले एकमेव आमदार
गणेश वाघ
Beloved sisters support in Bhusawal ; Hindutva issue proved effective भुसावळ (26 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभेच्या पटलावर सलग तीन पंचवार्षिकपासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांची लढत महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार डॉ.राजेश मानवतकर यांच्याशी झाली. आधी तुतारीचा प्रचार जोमाने केल्यानंतर ऐनवेळी काँग्रेसला जागा सुटल्यानंतर उमेदवारीची माळ डॉ.राजेश मानवतकर यांच्या गळ्यात टाकण्यात आल्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये नूरा कुस्तीसारखी लढत झाली. तीन टर्मपासून केलेली कामे, जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली स्वच्छ प्रतिमा, हिंदूत्वाचा प्रभावी मुद्दा व लाडक्या बहिणींच्या लाभलेल्या अनमोल साथ, संघ परिवाराने केलेल्या मदतीमुळे आमदार सावकारे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. 47 हजार 488 मतांनी आमदार सावकारे येथे विजयी झाले तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोयीचे राजकारण केल्याने येथे काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला.

हिंदूत्वाचा मुद्दा प्रभावी, लाडक्या बहिणींची साथ मोलाची
सलग तीन पंचवार्षिकपासून निर्विवाद वर्चस्व मिळवत आमदार असलेल्या संजय सावकारे यांनी गेल्या काळात विविध विकासकामे मार्गी लावली. स्वच्छ प्रतिमेमुळे सर्वच समाज घटकांमध्ये त्यांना स्थान पुन्हा अधोरेखीत झाले शिवाय निवडणुकीपूर्वी लागू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना व ‘एक है तो सेफ है’चा प्रचार जोमात करण्यात आला. भाजपाच्या तीन्ही उमेदवारांसाठी गृहमंत्री अमित शहा यांनी फैजपूरात सभा घेत ‘बटेंगे तो कटेंगे’ हा मुद्दा तळागाळातील हिंदूपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान केले शिवाय स्थानिक भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी आमदारांच्या विजयासाठी होम टू होम प्रचार करीत जनतेत सुरक्षीत हातात भुसावळची सत्ता जाणार असल्याचा विश्वास निर्माण केला.
राष्ट्रवादीची खेळी : ऐनवेळी काँग्रेसला तिकीट
माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरींमधील वितुष्ट पाहता राष्ट्रवादीने हक्काची जागा भुसावळातील मतदारांचा कल व नेत्यांमधील कलगीतुरा पाहता ही जागा काँग्रेसला सहज सोडली. काँग्रेसचा गेल्या काही वर्षात साधा येथे नगरसेवकही निवडून आलेला नाही शिवाय जनतेत प्रभाव निर्माण होईल, असा एकही स्थानिक नेता नसल्याने सारी भिस्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राहिली. माजी मंत्री खडसे हे मुलीच्या विजयासाठी मुक्ताईनगरात अडकले तर माजी आमदार संतोष चौधरी हे बंधू अनिल चौधरी यांच्यासाठी रावेरात ताकद लावून असल्याने नवखे उमेदवार डॉ.मानवतकर एकाकी पडले. महाविकास आघाडीतील उबाठा गट अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्यासोबत गेल्याने ताकद विभागली गेली व आमदार सावकारेंच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.
मतविभाजनाची खेळी अयशस्वी
सलग तीन टर्म आमदार असलेल्या सावकारे यांना पराभूत करण्यासाठी भुसावळातील राजकीय पक्षांनी फुगा निशाणी असलेल्या अपक्ष उमेदवार व लेवा समाजाच्या सून स्वाती जंगले यांना बळ दिले. भुसावळातील किंग मेकर असलेला लेवा समाज त्यांच्या पाठीशी राहून डॉ.मानवतकर यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल, अशी खेळी असलीतरी नऊ हजार 764 मतांच्या पलीकडे त्या मते घेवू शकल्या नाही तर गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या जगन सोनवणे यांना 2019 मध्ये 20 हजार 245 मते मिळाल्यानंतर त्यांनी वंचितची उमेदवारी मिळवली मात्र तीन हजार 720 मतांच्या पलीकडे ते जावू शकले नाहीत व त्यांचे डीपॉजिटही जप्त झाले. राजकीय पक्षांनी विजयासाठी केलेली मतविभाजनाची खेळी सुज्ञ मतदारांनी ओळखत त्यांना धोबीपछाड देत आमदार सावकारेंना भरभरून मतदान करीत त्यांना सलग चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी केले.
उमेदवार नवखा मात्र मतांचा वाढला आकडा
डॉ.मानवतकर राजकारणात नवखे होते शिवाय महाविकास आघाडीतील नेत्यांची त्यांच्या विजयासाठी ताकद मिळालीच नाही मात्र आहे त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर डॉक्टरांनी 59 हजार 771 मते मिळवली हे विशेष!. 2019 मध्ये त्यांच्या सौभाग्यवती डॉ.मधू मानवतकर अपक्ष उमेदवार असताना 28 हजार 675 मते मिळाली होती मात्र यावेळी डॉक्टरांनी दुप्पट मते मिळवली. नियोजन व समन्वयाचा अभाव, नेत्यांमध्ये नसलेला ताळमेळ व नेत्यांनी घेतलेली सोयीची भूमिका यामुळे काँग्रेस उमेदवाराचे व्हीजन मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही शिवाय माध्यमांपासून उमेदवार अलीप्त राहिल्याने त्याचा फटका पराभवात झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.




