भुसावळ पालिकेची थकबाकी न भरल्यास मालमत्ता होणार जप्त : मुख्याधिकार्यांचा इशारा
भुसावळ (27 नोव्हेंबर 2024) : भुसावळ पालिकेने 2024-25 या वर्षाचे मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी कर व गाळेधारक यांना मागणी बिल दिले असून ही बिले मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत नगरपरिषद कोषागारात ही बिले जमा करावीत अन्यथा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा इशारा पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.
थकबाकी भरण्याचे आवाहन
पालिकेकडून गेल्या काही दिवसांपूर्वीच शहरातील नागरिकांना मालमत्ता करासह पाणीपट्टी कर व गाळेधारक यांना मागणी बिल पालिकेमार्फत देण्यात आले आहे. पालिकेची वसुली अल्प असल्याने विकासकामे करताना अडचणी निर्माण होत आहे. थकबाकी वसुली मोठ्या प्रमाणात झाल्यास पालिकेला नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यास सोयीस्कर होणार आहे मात्र नागरिकांकडून थकबाकी भरण्यात येत नसल्याने थकबाकीचा आकडा दिवसागणिक वाढत आहे शिवाय नव्यानेच मालमत्ता धारकांना करापोटी बिले देण्यात आली असून संबंधितांनी ही रक्कम पालिकेत भरावी, असे आवाहन मुख्याधिकार्यांनी केले आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या इशारा पालिका प्रशासनाने निवेदनाद्वारे दिला आहे.