शेअर ट्रेडिंगमध्ये लाभाचे आमिष : अमळनेरच्या ठेकेदाराची पावणेतीन कोटींची फसवणूक


Bait of profit in share trading : Amalner contractor cheated of Rs. 3.5 crores जळगाव (29 नोव्हेंबर 2024) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर ठगांनी अमळनेेर येथील एका ठेकेदाराला तब्बल 2 कोटी 72 लाखांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रचंड रक्कम बँक खात्यातून गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी 27 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेरच्या ठेकेदाराची फसवणूक
व्हॉटसअप मोबाइलवर चॅटिंग करून शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष सायबर ठगांनी ठेकेदाराला दाखविले. तक्रारदार हे खाजगी ठेकेदार म्हणून कार्यरत असून अमळनेर येथे वास्तव्यास आहेत. मोबाईल क्रमांकावर 26 जून ते 26 नोव्हेंबर दरम्यान अजय गर्ग, रितू वोरा यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर स्टॉक बुस्ट ग्रुपमध्ये त्यांना जॉईन केले. या ग्रुपची लिंकही पाठविली.

एसएमसी कॅपिटल नावाच्या प्लीकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळवा, असे आमिष तक्रारदार यांना ठगांनी दाखविले. तक्रारदार यांनी काही पैसे गुंतविले. सायबर ठगांनी त्यांच्या खात्यात तत्काळ एक हजार रुपयांचा परतावा केला आणि नफा झाला, असे भासविले. त्याबरोबरच ठगांनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन करत त्यांना जाळ्यात ओढले. तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी 2 कोटी 72 लाख इतकी रक्कम आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात ठगांनी स्वीकारली. मोठी रक्कम खात्यातून जाताच ठगांनी संपर्क तोडला. तक्रारदार यांनी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली. त्यानुसार बुधवार, 27 रोजी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड हे करीत आहेत.


कॉपी करू नका.